सीमावाद सुरु असतानाच CM बोम्मईंचं पुन्हा ट्विट; आता थेट शहांच्या खासदार भेटीवर केलं भाष्य

मुंबई: महाविकास आघाडीच्या खासदारांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर तोडगा काढू असे आश्वासन त्यांनी दिल्याचेही या खासदारांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या खासदारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार केली आहे. अमित शाह येत्या 14 डिसेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहितीही महाविकास आघाडीच्या खासदारांनी दिली आहे.यावरच पुन्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी खपली काढण्याचा प्रयत्न केला आहे. अमित शहा यांच्या भेटीनंतर बोम्मई यांनी अडमुठेपणा करत ट्विट केलं आहे. यामुळे पुन्हा हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. त्यांनी ट्विटमद्धे म्हंटलं आहे की, "महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही, महाराष्ट्राने यापूर्वीही असा प्रयत्न केला आहे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे, सर्वोच्च न्यायालयात आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे. आमचे सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही. राज्याची कायदेशीर भूमिका मांडण्यासाठी मी लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांनाही भेटणार आहे" असं ट्विट कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलं आहे.काल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भेट घेतली याला उत्तर म्हणून त्यांनी हे ट्विट केलं आहे. यावरून केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर केंद्र सरकारच्या भूमिकेचाही एकप्रकारे अपमान त्यांच्या या ट्विटमधून दिसून आले आहे. त्यामुळे नेमकं कोणाच्या पाठिंब्यामुळे आणि कोणत्या आत्मविश्वासावर ते ही सर्व विधाने करतात असा प्रश्न निर्माण होतो आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने