काश्मीरमधील निवडणूकीसाठी २०२४ पर्यंत प्रतिक्षा करावी लागू नये; गुलाम नबी आझाद

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक होण्यासाठी २०२४ पर्यंत प्रतिक्षा केली जाऊ नये. येत्या सहा महिन्यांत निवडणूक घेतली जावी, असे आग्रही मत जम्मू काश्मीरचे ज्येष्ठ नेते तसेच माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केले. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी अलीकडेच डेमोक्रॅटिक आझाद पक्षाची (डीएपी) स्थापना केली आहे. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरला आर्थिक आणि राजकीय संकटातून बाहेर काढण्यासाठी निवडणूक होणे महत्त्वाचे आहे. येथील जनता २०२४ पर्यंत प्रतिक्षा करू शकणार नाही. बदल घडावा म्हणून आम्ही गेली कित्येक वर्षे वाट बघत आहोत. त्यामुळे पुढील सहा महिन्यांत जेव्हा हवामान अनुकूल बनले तेव्हा निवडणूक घेतली जावी.जम्मू-काश्मीर विधानसभा २०१८ मध्ये बरखास्त करण्याची गरज नव्हती. मात्र तसे झाल्यानंतर सहा महिन्यांत निवडणूक व्हायला हवी होती, असे मतही व्यक्त करून ते म्हणाले की, तेव्हा राज्यात दहशतवाद नव्हता, तणाव नव्हता. त्यामुळे निवडणूका तेव्हाच व्हायला हव्या होत्या, पण त्यानंतर पाच वर्षे उलटली असून या कालावधीत विचारही करता येणार नाहीत अशा घडामोडी घडल्या आहेत. ३७०वे कलम रद्द केले जाणे, इतक्या जुन्या राज्याचे तुकडे होणे असे घडले. त्यानंतर प्रत्येक बाबतीत आमच्या राज्याची स्थिती बिघडत गेली.जम्मू-काश्मीरमध्ये एकही लोकप्रतिनिधी नाही, आमदार नाही, मंत्री नाही, मुख्यमंत्री नाही. मग लोक कुठे जाणार ? डॉक्टर, शिक्षक, रस्ते, रोजगार असे काही नाही, मग जनतेने कुणाशी संपर्क साधायचा. मजूर, युवक असे सगळे हताश आहेत. युवक उच्च शिक्षण घेऊन अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने