ब्राझीलचा धडाकेबाज विजय! कोरियावर मात करीत थाटात उपउपांत्य फेरीत

कतार : स्ट्रायकर नेमार संघात परतल्यानंतर बळ मिळालेल्या बलाढ्य ब्राझीलने आज दक्षिण कोरियावर ४-१ असा धडाकेबाज विजय मिळविला आणि विश्वकरंडक स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. तेथे त्यांची लढत क्रोएशियाशी होईल. ब्राझीलने चारही गोल पूर्वार्धातच केले आणि कोरियाच्या आव्हानातील हवाच काढून घेतली. यामुळे जपाननंतर दुसरा आशियाई संघही स्पर्धेबाहेर गेला आहे. कोरियाने तुलनेत उत्तरार्धात चांगला प्रतिकार करून एक गोलही केला.ब्राझीलच्या गोल धडाक्याची सुरुवात सातव्या मिनिटापासून सुरू झाली. ब्राझील कोरियाच्या डीच्याजवळ होते. यावेळी राफीन्हाने नेमारकडे पास दिला. नेमार डीमध्ये मध्यभागी होता. चेंडू त्याच्या पुढ्यातून डाव्या बगलेतील विनिशियस ज्युनिअरच्या पायात आला. त्याने हलकासा टच केला. क्षणभर थांबून अंदाज घेत झटकन गोल पोस्टच्या डाव्या कॉर्नरमध्ये सहजरित्या धाडला.तेराव्या मिनिटाला ब्राझीलला पेनल्टी मिळाली. ही संधी नेमारने साधत आघाडी २-० अशी केली. कोरिया गोलची संधी शोधत होता. पुढे २९ व्या मिनिटाला रिचर्लिसन याने अफलातून गोल करीत आघाडी ३-० अशी केली. हा सांघिक गोल खास ब्राझील शैलीतील होता. रिचर्लिसनने हेड करीत चेंडू मार्किनहोसकडे दिला. त्याने कासेमिराकडे सोपविला. त्याने हलकासा पास देत रिचर्लिसनकडे दिला. झटपट पासिंगमुळे कोरियाची संरक्षक फळी काहीशी विस्कळीत झाली. त्याचा फायदा उठवत रिचर्लिसनने चेंडू गोल जाळ्यात धाडला.ब्राझीलच्या चाहत्यांनी या गोलवर एकच जल्लोष केला. ३६ व्या मिनिटाला पक्वेटाने एक अफलातून गोल करीत पूर्वार्धातच ब्राझीलची आघाडी ४-० अशी निर्णायकी केली. खोलवर मिळालेला पास घेऊन रिचर्लिसन डीच्या दिशेने निघाला. त्याने नेमारकडे चेंडू टोलविला. त्याने विनिशियसकडे दिला. त्याने क्रॉस टाकत चेंडू पक्वेटाकडे दिला. त्याने क्षणार्धात चेंडूला दिशा देत चौथा गोल साकारला. कोरियाकडून फाईक सेऊंग हो याने ७६ व्या मिनिटाला गोल केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने