चर्चा तर होणारच! अदिती- आस्तादच्या नाटकाला परदेशातून आमंत्रण.. या देशात..

मुंबई: राजकीय आणि सामाजिक वक्तव्यावरून घडणाऱ्या चर्चा याचे उलट सुलट प्रतिबिंब समाजात उमटत असते. कित्येकदा या चर्चा उलथापालथ करणाऱ्या ठरल्या आहेत. वेगवेगळ्या चर्चांनी सध्या देशातील वातावरण चांगलंच गढुळलेलं आहे. त्यात आता 'पठाण' मधील गाण्यावरून 'रंगासंगे युद्ध आमचे सुरु' हा चर्चेचा नवा अंक रंगत असताना मराठी रंगभूमीवरील एका चर्चेने प्रेक्षकांना खडबडून जागं केलं आहे. अगदी परदेशातही या चर्चेची दखल घेतली आहे. अदिती सारंगधर, आस्ताद काळे, आणि क्षितिज झारापकर या त्रयीचं 'चर्चा तर होणारच' या नाटकाच्या प्रयोगांना परदेशातील नाट्य रसिकांकडून नाटकाच्या प्रयोगासाठी खास आवताण देण्यात आलं आहे.

या नाटकाला अमेरिका, सिंगापूर, दुबई येथील महाराष्ट्र मंडळाकडून हे आमंत्रण देण्यात आलं आहे. नाटकाचे अधिकाधिक प्रयोग परदेशात व्हावे अशी इच्छा परदेशातील नाट्यरसिक व्यक्त करत आहेत. परस्पर विचारसरणीच्या विरोधात दंड थोपटून उभ्या असलेल्या दोन कार्यकर्त्यांची गोष्ट या नाटकात आहे . एका सामाजिक पुरस्काराच्या निमित्ताने मुद्दाम झडविल्या गेलेल्या वैचारिक जुगलबंदीत कोण, कसे डावपेच खेळतात याची रंगतदार मांडणी केलेलं नाटकं म्हणजे ‘चर्चा तर होणारच!’

लेखक-दिग्दर्शक हेमंत एदलाबादकर यांनी ‘चर्चा तर होणारच!’ या नाटकाद्वारे सद्य: परिस्थितीवर भाष्य करत घडवून आणलेली चर्चा विचारमंथन करायला भाग पाडते. अदिती सारंगधर, आस्ताद काळे, आणि क्षितिज झारापकर यांनी आपल्या सशक्त अभिनयाने या नाटकाला चारचाँद लावले आहेत.रंगनील व वेद प्रॉडक्शन्स निर्मित आणि आर्या व्हिजन प्रस्तुत हे नाटक सध्या तुफान गाजतंय. मुंबई पुण्यातल्या प्रयोगांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. लवकरच कोकण दौरा आयोजित केला जाणार आहे. कल्पना कोठारी आणि विनय अलगेरी या नाटकाचे निर्माते आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने