भारत एक महान शक्ती बनेल

वॉशिंग्टन : भारत हा एक व्यूहात्मकदृष्ट्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण देश असून भविष्यात तो अमेरिकेचा सहकारी देश नव्हे, तर एक महान शक्ती बनेल, असे भाकीत ‘व्हाइट हाऊस’मधील आशिया विभागाचे समन्वयक कर्ट कॅम्पबेल यांनी आज वर्तविले. गेल्या वीस वर्षांत भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध ज्यावेगाने दृढ आणि सखोल होत गेले, तसे इतर कोणत्याही देशांच्या बाबतीत झालेले नाही, असेही कॅम्पबेल म्हणाले. एका सुरक्षा विषयक बैठकीत भारताबाबत प्रश्‍न विचारला असता कर्ट कॅम्पबेल म्हणाले,‘‘भारत हा अमेरिकेचा सर्वांत महत्त्वाचा मित्रदेश आहे. भारताकडे प्रचंड क्षमता असून या क्षमतेचा वापर करून विविध क्षेत्रांमधील संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न अमेरिका सरकारने करायला हवा.



व्यूहात्मकदृष्ट्या भारत हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण देश आहे. भविष्यात तो अमेरिकेचा केवळ सहकारी देश नसेल. या देशाला स्वावलंबी आणि सामर्थ्यवान बनण्याची महत्त्वाकांक्षा आहे. भारत एक महाशक्ती बनू शकतो.’’ भारत आणि अमेरिकेमध्ये काही मुद्द्यांवर एकमत नसले आणि दोघांसमोर अनेक आव्हाने असली तरी, भविष्यात एकत्र येऊन काही साध्य करण्याची क्षमता या दोन देशांच्या संबंधांत आहे, असेही कॅम्पबेल म्हणाले. अवकाश तंत्रज्ञान, शिक्षण, पर्यावरण, तंत्रज्ञान या क्षेत्रात बरेच काम करण्याची संधी असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने