महागाईची चिंता बाजूला ठेवत अर्जेंटिनात अभूतपूर्व जल्लोष

अर्जेंटिना: अर्जेंटिना हा देश सध्या महागाईच्या खाईत लोटलेला असताना तेथील रहिवाशांनी या महागाईची चिंता काही काळ दूर ठेवून आपल्या खेळाडूंनी दिलेला विश्वकरंडक विजेतेपदाचा आनंद अतिशय जल्लोषात साजरा केला.अर्जेंटिनाची राजधानी असलेल्या ब्युनोस आर्यस शहरातील मख्य चौकात लक्षावधी लोक एकत्र येऊन आपल्या संघाचे विश्वकरंडक स्पर्धेतील अभूतपूर्व यश साजरे करत होते. सुपरस्टार लिओनेल मेस्सी राहत असलेले रोसामिरो शहर तर जल्लोषात न्हाऊन निघाले होते.अर्जेंटिनाच्या स्थानिक वेळेनुसार रविवारी दुपारी अंतिम सामना झाला. ९० मिनिटे, त्यानंतर अर्ध्या तासाचा जादा डाव आणि पेनल्टी शूटआऊट असा खेळ होता होता सायंकाळ झाली. करोडोंच्या संख्येने लोक रस्त्यावर येऊन सामन्याचा आनंद घेत होते. अखेर मेस्सीच्या संघाने पेनल्टी किकवर सामना जिंकल्यानंतर अभूतपूर्व जल्लोष झाला. आम्ही चॅम्पियन आहोत. हे यश आम्हाला हवे होते. मेस्सीकडून आम्ही याच यशाची अपेक्षा केली होती, संपूर्ण संघाने आम्हाला हे यश मिळवून दिले, अशी भावना सँतियागो फेरारी या २५ वर्षीय युवकाने व्यक्त केली.हा जल्लोष केला जात असताना मेस्सीचे मोठे कटाऊट, अर्जेंटिनाचे असंख्य राष्ट्रध्वज डौलाने फडकावले जात होते. मेस्सीने विश्वकरंडक उंचावल्यावर आणखी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर आले. रात्री उशिरापर्यंत हा जल्लोष सुरू होता. देशात घडत असलेल्या सर्व वाईट गोष्टींच्या पलीकडे अर्जेंटिना या आनंदाला पात्र आहे आणि आम्हाला समाधान देणारा आहे, असे २१ वर्षीय रॉड्रिगो मेडिना याने सांगितले. १९८६ मध्ये दिएगो मॅराडोना यांच्या संघाने अर्जेंटिनाला विश्वकरंडक जिंकून दिल्यानंतर ३६ वर्षांनी पुन्हा ते विश्वविजेते झाले आहेत.

ओटीटीवर ३ कोटी २० लाख प्रेक्षक

विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा अतिशय चित्तथराक अंतिम सामना ओटीटीवरही तेवढाच प्रेक्षणीय ठरला. पेनल्टी शूटआऊटपर्यंत रंगलेल्या सामना जिओ सिनेमा या अॅपवर तब्बल ३ कोटी २० लाख प्रेक्षकांना पाहिला, अशी माहिती देण्यात आली. ओटीटीवर मिळालेली ही सर्वात मोठी पसंती असेही सांगण्यात येत आहे. जिओ सिनेमा आणि स्पोर्टस १८ वाहिनी यांची एकत्रित मिळून प्रेक्षकसंख्या ४ अब्जाच्या घरात असल्याचा दावा करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने