आंतरधर्मीय लग्नाला विरोध नाही पण...; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!

 मुंबई : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने सगळा देश ढवळून निघाला आहे. हे प्रकरण राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही चांगलंच गाजलं. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आपण विशेष पोलीस पथक नेमणार असल्याचं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.आंतरधर्मीय विवाहांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य शासनाकडून एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती तसंच श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे उफाळून आलेली लव्ह जिहाद कायद्याची मागणी याबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणलाे, "श्रद्धा वालकर हत्या प्रकरण हे मानवतेला काळीमा फासणारं आहे. तिने केलेली तक्रार मागे घेण्याबाबत अजून कोणताही राजकीय किंवा बाहेरच्या व्यक्तीचा दबाव असल्याचं आढळून आलेलं नाही. तक्रार करून एका महिन्यात ती मागे घेतली आहे.


फडणवीस पुढे म्हणाले, "२३ तारखेला तक्रार केली आणि पुढच्या महिन्यात १९ तारखेला ती मागे घेतली. या एका महिन्यांत पोलिसांनी काय केलं? पोलिसांवर राजकीय दबाव होता का याबाबत आम्ही माहिती घेतो आहे. कारवाई का करण्यात आलेली नाही, याचा तपास करत आहोत. अशा प्रकारच्या घटनेत महिलेची तक्रार आली तर तिला बोलावून माहिती घेतली पाहिजे, अशा सूचना दिल्या आहेत. अशा प्रकरणात ४० मोर्चे निघाले. लव्ह जिहादचा कायदा करण्याची मागणीही झाली."

आंतरधर्मीय विवाहाबद्दलची आपली भूमिका मांडताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आंतरधर्मीय लग्नाला माझा विरोध नाही. पण गेल्या काही काळामध्ये षडयंत्र करून विवाह होत आहेत. वर्षभरात मुलीला त्रास दिला जातो. ती परत येते आणि मग अशा घटना बाहेर येताना दिसतात. मी कोणत्याही धर्माविरोधात नाही. पण अशा गोष्टी होतायत हे सत्य आहे आणि ते स्विकारावे लागेल. वेगवेगळ्या राज्यांनी जे कायदे केले आहेत,त्यांचा अभ्यास केला जाईल. कोणत्याही महिलेची फसवणूक होऊ नये, ही राज्याची भूमिका राहील. सध्या आम्ही अभ्यास करत आहोत. इतर राज्यांचा कायदा प्रभावी असेल, तर राज्य सरकार प्रभावी कायदा करेल. "

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने