‘वर्क फ्रॉम होम’मुळे वाढले कामाचे समाधान

मेलबोर्न : कोरोनाकाळात सर्वांसाठी वर्क फ्रॉम होम हे न्यूनॉर्मल होतं, या कार्यपद्धतीचा अनेकांच्या मानसिक स्वास्थ्यावर देखील परिणाम झाला. अनेकांच्या मागचा कामाचा व्याप वाढला तर काहीजण रिलॅक्स झाले. ऑस्ट्रेलियामध्ये याच वर्कफ्रॉम होम संस्कृतीचे काही समाधानकारक निष्कर्ष पाहायला मिळाले आहेत.यामुळे महिलांमधील कामाप्रतीचे समाधान वाढल्याचे दिसून आले. पुरूषांच्या तुलनेमध्ये हे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. एचआयएलडीए (हाउसहोल्ड, इनकम अँड लेबर डायनॅमिक्स ईन ऑस्ट्रेलिया) या संघटनेने याबाबतचे सर्वेक्षण केले होते.
कोरोनाकाळामध्ये घरून काम करणाऱ्यांची संख्या २१ टक्क्यांवर पोचली होती त्याआधी हे प्रमाण केवळ ६ टक्के एवढेच होते. या संघटनेकडून अद्याप प्रसिद्ध न झालेल्या आकडेवारीनुसार हे प्रमाण २०२१ मध्ये २४ टक्क्यांवर गेले होते. वर्क फ्रॉम होमचा विशेषतः महिलांना मोठा फायदा झाल्याचे दिसून आले. पुरूषांच्या तुलनेमध्ये हे प्रमाण नक्कीच दखलपात्र होते. पुरुषांना मात्र त्याचा म्हणावा तेवढा लाभ झाला नाही. घरून काम करताना महिलांना मुलांकडे लक्ष देण्याची संधी मिळाली. दोन दिवस घरून तर तीन दिवस कार्यालयातून काम करणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाल्याचे दिसले. अशा स्थितीत महिलांमधील कामाप्रतीचे समाधान ०.९ टक्क्यांनी वाढले.

सामाजिक विलगीकरण

घरून काम करावे लागत असल्याने प्रत्यक्ष काम आणि त्याच्या व्यतिरिक्तच्या गोष्टी यामध्ये समतोल साधण्याची संधी अनेकांना मिळाली, याकाळात अनेकांना कार्यालयीन बैठकांना कमी उपस्थिती लावावी लागली तसेच त्यांना अन्य गोष्टींचा त्रासही कमी झाल्याचे दिसून आले. म्हणजेच त्यांच्यासाठी घरून काम करणे हे कमी तणावाचे होते. प्रत्यक्ष काम आणि कामा व्यतिरिक्तचा वेळ यांच्यातील सीमारेषा धूसर झाली होती परिणामी अनेकांना विलगीकरणात राहावे लागले. त्यांना सहकाऱ्यांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली नाही.

नकारात्मक परिणाम वाढला

वर्कफ्रॉम होममुळे ज्यांच्या कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम झाला अशांची संख्या ४२ टक्के होती तर सकारात्मक परिणाम झालेल्यांची संख्या २४ टक्के एवढी भरली. एक तृतीयांश लोकांनी त्यांच्या क्षमतेमध्ये किंचित बदल झाल्याचे सांगितले तर अर्ध्यापेक्षा अधिक लोकांनी याचा त्यांच्या कार्यपद्धतीवर कसलाही नकारात्मक परिणाम झाला नसल्याचे नमूद केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने