पुणे : मागच्या बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेला कुस्तीगीर परिषदेचा वाद अखेर मिटला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या मध्यस्थिनं तोडगा काढण्यात आला असून बाळासाहेब लांडगे यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या सचिवपदाचा राजीनामा दिला आहे. तर रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखालील नवीन कार्यकारिणी आता काम पाहाणार असून शरद पवार हे मुख्य आश्रयदाते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
सविस्तर माहिती अशी की, केल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद नेमकी कोणाची यावरून वाद सुरू होता. या वादावर सर्वमताने यावर तोडगा काढण्यात आला आहे. शरद पवार यांनी या परिषदेच्या अध्यक्षपदाचा तर बाळासाहेब लांडगे यांनी सचिव पदाचा राजीनामा भारतीय कुस्ती महासंघाकडे दिला आहे. भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कुस्तीगीर परीषदेचं काम नवीन कार्यकारिणी पाहाणार आहे.तसेच शरद पवार यांना मुख्य आश्रयदाते म्हणून कुस्तीगीर परिषदेमध्ये मान देण्यात आला आहे, बाळासाहेब लांडगे यांना आश्रयदाते म्हणून परिषदेत सामावून घेण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या मध्यस्थीने हा तोडगा काढण्यात आला.यामुळे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ आजोयक असलेल्या ११ ते १५ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात येणार असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धांचा मार्ग मोकळा झाला आहे.
काही दिवसांपूर्वी कुस्तीगीर परिषदेतील अंतर्गत वाद उफाळून वर आला होता, यामध्ये 30 जून 2022 रोजी अखिल भारतीय कुस्तीगीर महासंघाने, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या बरखास्तीचं कारण देताना भारतीय कुस्तीगीर महासंघाने त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे राज्य कुस्तीगीर परिषदेने काही स्पर्धा घेतल्या नाहीत. तसेच काही तक्रारी कुस्ती महासंघाकडे आल्याचे म्हटले होते. त्यानंतर हा वाद पेटला होता.