'दीड वर्षापूर्वी माझ्या गालावर अचानक..',मधुराणीनं केला चेहऱ्यावरील जखमेचा मोठा खुलासा

मुंबई: ग्लॅमर इंडस्ट्रीत काम करायचं म्हटलं की सुंदर दिसणं हे अपरिहार्य आहे हा कालपरवा पर्यंतचा समज होता, पण आता हळूहळू का होईना तो विचार पुसट होत चालला आहे. आता दिसण्या इतकंचं अभिनयाला देखील महत्त्व दिलं जाताना दिसत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मनं हा बदल घडवून आणला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पण आजही मनोरंजन सृष्टीत काही जणं दिसणं महत्त्वाचं मानतात हे देखील नाकारता यायचं नाही.आता इंडस्ट्रीत अनेक कलाकारांनी नाकाची,ओठाची,चेहऱ्याची सर्जरी केल्याचं आपल्या सगळ्यांनाच माहितीय. पण असे अनेक कलाकार ज्यांना आपल्या दिसण्यापेक्षा अधिक महत्त्वाचं वाटतं आपलं अस्तित्व स्विकारणं...आणि हे सिद्ध करुन दाखवलं आहे 'आई कुठे काय करते' या मालिकेची मुख्य अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिनं. तिनं गत वर्षाला बाय बाय करत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे,ज्यात आपल्या गालावरील जखमेचा तिनं खुलासा केला आहे.
आपण जर 'आई कुठे काय करते' ही मालिका पाहत असाल तर एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली असेल ती अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकरच्या गालावर झालेली जखम..काही मालिकेच्या भागातही मधुराणीनं गालावर पट्टी लावून शूट केलं होतं. गेली अनेक दिवस तिचे चाहतेही तिच्या पोस्टवर कमेंट करून त्या जखमे विषयी विचारपूस करत होते. आता मधुराणीनं एका व्हिडीओच्या माध्यमातून या आपल्या गालावरच्या जखमेचा खुलासा करत गेल्या वर्षभरात या जखमेनं आपल्याला खूप शिकवलं असं म्हटलं आहे.''दीड वर्षापूर्वी आपल्या गालावर अचानक एक उंचवटा दिसायला लागला...तपासलं तेव्हा कळलं तो गळू म्हणजे उबाळ्याचा प्रकार...औषधानं बरा होणार नाही म्हणून सर्जरी करणं भाग होतं. आणि ती केल्यावर त्याचा डाग कायम राहिला...पण मी त्या जखमेचे आभार मानेन कारण गेल्या वर्षभरात या जखमेनं मला खूप शिकवलं. मी चेहऱ्यावर पट्टी लावून काम केलं पण माझ्यावरील मायबाप प्रेक्षकांचे प्रेम तसूभरही कमी झालं नाही''.

''त्यांनी मी जशी आहे तसं मला स्विकारलं. दोनदा एकाच ठिकाणी सर्जरी झाल्यावर मी खरंतर घाबरले होते. पण माझ्या सहकाऱ्यांनी, आपल्या लोकांनी मला आधार दिला पण त्याहून अधिक माझा मनापासून स्विकार केला. गेल्या वर्षात या जखमेमुळे मी शिकले जसं आहे तसं स्वतःला स्विकारायला, केवळ बाहेरून नाही तर आतुन मन स्वच्छ करायला...झालं गेलं सोडून द्यायला...'' मधुराणीनं व्हिडीओतून आपल्या जखमेचा खुलासा करतानाच गत वर्षात जे झालं ते सोडून द्या...राग-रुसवे विसरा अन् आनंदान नववर्षाचं स्वागत करा हे देखील आवर्जुन सांगितलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने