महाराष्ट्रातील विरोधीपक्षावरच भडकले बोम्माई; म्हणाले, मानसिक संतुलन...

बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्यांवर टीका करताना म्हटले आहे की, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. पत्रकारांशी बोलताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षांच्या सदस्यांवर सीमारेषेचे राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.'महाराष्ट्र राज्य विधानसभेतील विरोधीपक्ष नेत्यांनी सभागृहाच्या आत आणि सभागृहाबाहेर केलेल्या विधानांवरून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचं स्पष्ट होतं. याआधीच सीमावादातून राजकीय फायदा उठविण्याचा निष्फळ प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता. यावेळी ते तसे करण्यात अपयशी ठरले आहेत,' अस बोम्मई म्हणाले.बोम्मई यांनी मुंबईत आयोजित निषेध मोर्चावरही टीका केली. ते म्हणाले की, निषेध मोर्चा "राजकीय हेतूने प्रेरित" होता. यात केवळ विरोधी पक्षांचे सदस्य सहभागी झाले होते. 'ज्या वेळी दोन्ही राज्यातील लोक सौहार्दपूर्ण संबंध ठेवत आहेत, व्यवसाय करत आहेत आणि लोक राज्याराज्यांमध्ये प्रवास करत आहेत, अशा वेळी हे नेते कर्नाटकात मोठ्या प्रमाणात प्रवेश करण्याचा आणि लोकांना उत्तेजित करण्याचा प्रयत्न करत आहेत.जनतेचा पाठिंबा नसतानाही त्यांनी पक्षाचे झेंडे घेऊन मोर्चा काढला. ज्यात विरोधी पक्षांचे सदस्य आणि त्यांचे पदाधिकारीच सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. तसेच हा मोर्चा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचेही स्पष्टपणे दिसून येते, असंही बोम्मई यांनी नमूद केलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने