मोदीच नव्या भारताचे राष्ट्रपिता, अभिरुप न्यायालयात अमृता फडणविसांचा जबाब

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त अमृता फडणवीस यांनी मोदी देशाचे राष्ट्रपिता असल्याचे सांगत त्यांना आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्याचा आरोप वकिलांकडून अभिरूप न्यायालयात अमृता फडणवीस यांच्यावर करण्यात आला. मोदीजी राष्ट्रपिता, तर महात्मा गांधी कोण? असा प्रश्‍न त्यांना करण्यात आला. तेव्हा ‘आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे आणि नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत’ असा खुलासा जबाब नोंदवताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केला.नरेंद्र मोदीच नव्या भारताचे राष्ट्रपिता

अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे अभिरूप न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यामध्ये वकील म्हणून उपस्थित असलेल्या अजेय गंपावार यांनी आठ पानांचे आरोपपत्र सादर केले. या प्रकरणी अभिरूप न्यायालयातील न्यायमूर्ती ॲड. कुमकुम सिरपूरकर यांच्या समक्ष सुनावणी झाली. सुनावणीत अमृता फडणवीस यांनी आपली बाजू स्वत: मांडत दिलखुलासपणे आरोप उधळून लावले तर काही आरोप प्रामाणिकपणे मान्यही केले. न्यायालयात लिपिक म्हणून रश्मी पदवाड-मदनकर यांनी भूमिका बजावली. संस्थेच्या प्रथम अध्यक्षा ताराबाई शास्त्री यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वडील, भाऊ गौरव, आई, देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्री यांनी चलचित्र फितीद्वारे अमृता यांच्यावर काही आरोप केले अन्‌ काही मुद्यांद्वारे अमृता फडणविसांची बाजूही मांडली. तत्पूर्वी, चित्रकार निरंजन गोहाणे यांनी काढलेले चित्र भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुप्रिया अय्यर यांनी केले. तर, सूत्रसंचालन स्वाती सुरंगळीकर यांनी, आभार हेमा नागपूरकर यांनी मानले. कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती (निवृत्त) विकास सिरपूरकर, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश एदलाबादकर न्यायालयात प्रकरण ऐकण्यास उपस्थित होते.नागपूर अभिव्यक्ती लेखिका संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अभिरूप न्यायालयात अजेय गंपावार यांच्या आरोपांवर खुलासा करताना अमृता फडणवीस. तर, सुनावणी दरम्यान जबाबाची नोंद घेताना न्यायमूर्ती रुपी ॲड. कुमकुम सिरपूरकर.

महाविकास आघाडीचे ट्रोलर्स सक्रिय

अजेय गंपावार यांनी सोशल मीडियावर सतत ट्रोल होण्याबाबत अमृता फडणवीस यांना प्रश्‍नरूपी आरोप केला. यावर त्या म्हणाल्या, माझे स्वत:चे स्वतंत्र विचार आहेत. ते व्यक्त करणे मला आवडते. त्याचा कधी मला तर कधी देवेंद्र फडणवीस यांना तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे मी आता किमान व्यक्त होत आहे, असे कबूल केले. मात्र, घाबरत मुळीच नाही. मला ट्रोल करणारे ट्रोलर्स प्रचंड क्रिएटिव्ह आहेत. त्यांच्याकडे बराच वेळ असतो. मात्र, ते सारेच महाविकास आघाडीने ५ पैसे देऊन सोशल मीडियावर सक्रिय केलेले सैन्य आहे, असा आरोपही त्यांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने