‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच विकास सावंतला लागली लॉटरी; प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिली चित्रपटाची ऑफर

मुंबई: बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. छोटा पॅकेट बडा धमाका असलेल्या विकास सावंतने घरात एन्ट्री घेताच सदस्यांसह प्रेक्षकांचेही डोळे उंचावले होते. सुरुवातीला फारसा न दिसणारा विकासने नंतर मात्र घरात कल्ला केला होता. टास्कमध्ये त्याची शक्ती व आक्रमकता पाहून सदस्यही भारावून गेले होते.‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चेहऱ्यांपैकी एक असलेल्या विकास सावंतचा गेल्या आठवड्यात घरातील प्रवास संपुष्टात आला. त्यामुळे खेळ सोडत विकासला घरातून बाहेर पडावे लागले. परंतु, ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर विकासने ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली.विकास सावतंने या मुलाखतीत घरातील सदस्य व खेळाबाबत अनेक खुलासे केले आहेत. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच विकास सावंतला लॉटरीही लागली आहे. ‘बिग बॉस मराठी’चे होस्ट व मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी विकासला चित्रपटाची ऑफर दिली आहे. याचा खुलासा मुलाखतीत विकासने केला.

“महेश मांजरेकर सरांकडून मला चित्रपटाची ऑफर मिळाली आहे. मी खरंच खूप खूश आहे. माझ्या भविष्यकाळातील प्रोजेक्टसाठी मी उत्सुक आहे. कोरिओग्राफर होण्याचं स्वप्नही मला पूर्ण करायचं आहे. बिग बॉसने मला सर्व काही दिलं आहे. यासाठी मी त्यांचा आभारी आहे”, असं विकास म्हणाला.विकासची ‘बिग बॉस’च्या घरात किरण मानेंबरोबर घट्ट मैत्री जुळली होती. अनेकदा त्यांचे खटके उडालेलेही पाहायला मिळायचे. परंतु तरीही त्यांच्यातील मैत्री कायम होती. विकास घरातून बाहेर पडताना किरण माने भावूक झाले होते. ‘बिग बॉस’ची ट्रॉफी किरण मानेंनीच जिंकावी अशी इच्छा असल्याचं विकास घरातून बाहेर आल्यानंतर म्हणाला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने