कोण आहेत नंबी नारायणन? पाकला गुप्त माहिती पुरवल्याचे का लागले होते आरोप?

मुंबई : इस्त्रोचे माजी वैज्ञानिक नंबी नारायणन केसमध्ये ४ आरोपींना केरळ उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला होता. परंतु, आता केरळ उच्च न्यायालयाचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत अटकपूर्ण जामीन फेटाळला आहे. या निर्णयानंतर नंबी नारायणन यांची केस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हे प्रकरण नक्की काय आहे, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

१९९४ मध्ये नंबी नारायणन यांच्यावर झाले होते आरोप

नंबी नारायणन यांना वर्ष १९९४ मध्ये केरळ पोलिसांद्वारे फसवण्यात आले होते. त्यावेळी केरळमध्ये के करुणाकरन यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार होते. नंबी यांच्यासोबतच अन्य वैज्ञािनक डी शशिकुमार यांना देखील खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले होते. त्यांच्यावर मालदीवच्या महिला मरियम राशीदा आणि फौजी हसन यांना इस्त्रोची गुप्त कागदपत्रं पुरवल्याचा आरोप करण्यात आला होता.तसेच, त्यांच्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी करत महत्त्वाची माहिती पुरवल्याचा देखील आरोप करण्यात आले होते. इस्त्रोमध्ये असताना नांबी हे क्रायोजेनिक इंजिनवर काम करत होते. याच टेक्नोलॉजीची माहिती महिलांमार्फत पाकिस्तानला पोहचवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.
सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय

नारायणन यांना अटक केल्यानंतर जवळपास २४ वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला. वर्ष २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नारायणन यांना चुकीच्या पद्धतीने अटक करून त्रास देण्यात आला होता, असे म्हटले होते. सोबतच, सरकारला त्यांना ५० लाख रुपयांची भरपाई देण्याचे देखील आदेश दिले होते.नारायणन यांना चुकीच्या पद्धतीने अटक करून छळ करणे, याप्रकरणात दोषी अधिकाऱ्यांच्याविरोधात तपास करण्यासाठी समिती देण्यात आली होती. नंबी यांनी स्वतःविरोधात करण्यात आलेले आरोप फेटाळत मोठी न्यायालयीन लढाई लढली. अखेर, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.दरम्यान, आता नारायणन यांच्या प्रकरणात माजी डीजीपी सिबी मॅथ्यूज यांच्यासह पी. एस. जयप्रकाश, थंपी एस. दुर्गा दत्त, विजयन आणि आर. बी. श्रीकुमार यांचा अटकपूर्ण जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

नंबी नारायणन यांच्यावर आला आहे चित्रपट

वैज्ञानिक नंबी नारायणन यांच्यावर रॉकेट्री नावाचा चित्रपट देखील आला आहे. या चित्रपटात अभिनेता आर. माधवनने प्रमुख भूमिका साकारली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने