'आता विश्वविजेता म्हणून खेळायचंय' मेस्सी करतोय विचार...

अर्जेंटिना: ही आपली अखेरची विश्वकरंडक स्पर्धा असेल याचा पुनरुच्चार काही दिवसांपूर्वी करणाऱ्या लिओनेल मेस्सीला अर्जेंटिनाकडून अजून खेळायचे आहे. पुढची विश्वकरंडक स्पर्धा चार वर्षे दूर आहे, परंतु आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून आपण एवढ्यात निवृत्त होणार नसल्याचे मेस्सीने विश्वविजेतेपदानंतर सांगितले.विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे ऐतिहासिक विजेतेपद मिळवल्यानंतर अर्जेंटिना टीव्हीशी संवाद साधताना मेस्सीने देशाकडून अजून खेळण्याची इच्छा प्रकट केली. माझे फुटबॉलवर प्रेम आहे आणि मी हेच करू शकतो, असे तो म्हणाला.आम्ही आता विश्वविजेते आहोत आणि विश्वविजेता म्हणून मला आणखी काही सामन्यांत खेळायचे आहे. माझ्या अनुभवाचा फायदा अर्जेंटिना संघाला करून द्यायचा आहे, असे मेस्सीने सांगितले. खरे तर या अजिंक्यपदाबरोबर निवृत्त व्हायचे होते, पण यापेक्षा अधिकही काही मी मागू शकत नाही, एवढे भव्यदिव्य यश मला आणि माझ्या संघाला मिळाले आहे, असेही मेस्सी म्हणाला.मेस्सीची ही पाचवी विश्वकरंडक स्पर्धा होती. रविवारी फ्रान्सविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात त्याने पूर्ण वेळाच्या लढतीत दोन आणि पेनल्टी शूटआऊटवर एक गोल केला. संपूर्ण स्पर्धेत केलेल्या कामगिरीमुळे त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा गोल्डन बॉल हा पुरस्कार देण्यात आला.

२०२६ मध्ये होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत मेस्सी ३६ वर्षांचा होणार आहे. त्या स्पर्धेत आपण खेळणार नसल्याचे त्याने ही विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्याअगोदरच जाहीर केले होते, मेस्सीने पुढच्या विश्वकरंडक स्पर्धेतही खेळावे अशी इच्छा अर्जेंटिनाचे प्रशिक्षक लिओने स्कोलोनी यांनी व्यक्त केली. ही स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांत संयुक्तपणे होणार आहे.सर्वप्रथम आम्हाला २०२६ च्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरायचे आहे. मेस्सीला जर खेळायचे असेल, तर त्याचे स्वागतच आहे. आपल्या भविष्याबाबत निर्णय मेस्सीलाच घ्यायचे आहे, त्याने संघात खेळत राहावे अशी आम्हा सर्वांची मनस्वी इच्छा आहे, असे स्कोलोनी म्हणाले.मेस्सी हा माझा संघसहकारी होता, एका विश्वकरंडक स्पर्धेत आम्ही एकत्रपणे खेळलो होतो. आता त्याचे मार्गदर्शक होणे हा माझा बहुमान आहे. एक खेळाडू आणि व्यक्ती म्हणून संघासाठी सर्वस्व देणारा असा खेळाडू होणे कठीण आहे, अशा शब्दांत स्कोलोनी यांनी मेस्सीचा गौरव केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने