'इथं सिनेमात काम हवं तर...'; पाकिस्तानी अभिनेत्रीनं केली आपल्याच देशाची पोलखोल

 मुंबई: सुंदर दिसणं म्हणजे केवळ रंग-रुप इथपर्यंतच ते सीमित नसतं,एका स्टारची ओळख ही त्याच्या टॅलेंटनं होते. पण कदाचित पाकिस्तानातील लोकांना याचा विसर पडला असावा. लॉलीवूड इंडस्ट्रीत आजही स्टार्सला त्यांच्या काळ्या-गोऱ्या रंगाकडे पाहून काम दिलं जातं. हे आम्ही नाही बोलत आहोत,तर पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री सबूर अलीनं स्वतः आपल्या देशातील मनोरंजन सृष्टीची पोलखोल केली आहे.

पाकिस्तानी सिनेइंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री सबूर अलीनं एका टॉक शो मध्ये पाकिस्तानी सिनेइंडस्ट्रीची काळी बाजू लोकांसमोर आणली आहे. अभिनेत्रीनं सांगितलं आहे की सावळ्या रंगाच्या स्टार्सला स्क्रीनवर झळकण्याची संधी इथे फार दिली जात नाही. सबूरने या संदर्भात बोलताना सांगितलं आहे की- ''मला वाटतं की हे सत्य आहे, पण जसा काळ पुढे सरकतो गोष्टी बदलतात. आता लोक या गोष्टी विरोधात आवाज उठवू लागले आहेत,पण असं घडतं पाकिस्तानच्या सिनेइंडस्ट्रीत हे देखील सत्य आहे''.अभिनेत्री पुढे म्हणाली की-''आम्हालाही मेकअप करून गोरं दिसायला सांगितलं जातं. आम्हाला मेकअप करणाऱ्यांना आदेश दिले जातात की मेकअपचा बेस गोरा असायला हवा,अभिनेत्री गोरी दिसायला पाहिजे. कितीतरी वेळा असं होतं की जर प्रीव्ह्यूमध्ये आमचा रंग थोडा डार्क दिसला तर पुन्हा गोरं करून शॉट घेतला जातो''. पाकिस्तानी सिनेमाविषयी सबूर अलीनं खुलासा करत जे काही सांगितलं आहे त्याने सगळेच हैराण झाले आहेत. आणि अर्थातच यामुळे सबंध पाकिस्तानातील लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर प्रश्न निर्माण केला आहे.काही दिवस आधीच सबूर अली आणि तिच्या पतीची ब्यूटी ट्रीटमेंट घेतानाचे फोटो व्हायरल झाले होते,ज्यावरनं त्यांना ट्रोल देखील केलं गेलं होतं. चॅट शो मध्ये सबूरला जेव्हा ब्यूटी ट्रीटमेंटविषयी विचारलं गेलं तेव्हा तिनं म्हटलं की, ''आम्ही फक्त व्हिटामिन्सचे इंजेक्शन्स घेतले होते. आम्ही खूप काम करतो. त्यामुळे खूप मेकअपमुळे तर कधीकधी प्रदूषणामुळे त्वचा काळसर पडते. तसंच अनेकदा आम्हाला डीहायड्रेटेड फील होतं,म्हणूनच आम्ही व्हिटामिन्सचे इंजेक्शन घेतले होते''.अभिनेत्री पुढे म्हणाली-''ते इंजेक्शन्स घेतल्यानंतर मी गोरी दिसत होती का? जर असं असतं तर मी प्रत्येकवेळेला गोरी दिसली असती,पण तसं नाही झालं''.सबूर अली पाकिस्तानी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात २०११ मध्ये केली होती. पण अभिनेत्री म्हणून तिला खरी ओळख २०१५ मध्ये आलेल्या 'मिस्टर शमीम' या पाकिस्तानी ड्रामामुळे मिळाली. सबूरने २०१६ मध्ये रोमॅंटिक कॉमेडी सिनेमा 'एक्टर इन लॉ' च्या माध्यमातून सिने इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर सबूर अनेक मालिकांमध्ये देखील दिसली. तिचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यामुळे तिनं केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद मोठ्या स्तरावर उमटणार हे नक्की.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने