युरोप खंडातील संघावर दबाव वाढला! जपानच्या रडारवर आता क्रोएशिया

कतार : मागील विश्‍वकरंडकातील उपविजेता व फिफा क्रमवारीत १२ व्या स्थानावर असलेल्या क्रोएशियासमोर आज होत असलेल्या उप-उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत जपानचे आव्हान असणार आहे. जपानचा संघ सध्या क्रमवारीत २४ व्या स्थानावर आहे. क्रमवारीकडे बघता क्रोएशिया वरचढ दिसून येईल, पण सध्याच्या स्पर्धेतील फॉर्म बघता जपानचा संघ सुसाट आणि धडाकेबाज खेळ करतोय. या वेळी त्यांच्या रडारवर क्रोएशियाचा संघ असेल असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.जपानच्या संघाने साखळी फेरीत देदीप्यमान कामगिरी करीत बाद फेरी गाठली आहे. सलामीच्या लढतीत त्यांनी चार वेळच्या विजेत्या जर्मनीवर २-१ असा विजय मिळवला आणि त्यानंतर एक वेळचा विजेता स्पेनला २-१ अशी धूळ चारली. दोन माजी विजेत्यांना हरवताना जपानच्या खेळाडूंनी उत्तरार्धात आपल्या खेळाचा दर्जा उंचावला होता. युरोप खंडातील दोन बलाढ्य संघाला पराभूत केल्यानंतर जपानचा संघ क्रोएशिया या आणखी एका युरोपियन संघाला हरवण्यासाठी सज्ज झाला असेलच.उपविजेत्या संघाचा कस

मागील विश्‍वकरंडकात फ्रान्सकडून हार पत्करावी लागल्यानंतर उपविजेते पदावर समाधान मानावे लागलेल्या क्रोएशियाचा उद्याच्या लढतीत कस लागणार आहे. क्रोएशियाने साखळी फेरीत फक्त कॅनडाला पराभूत केले होते. मोरोक्को व बेल्जियम यांच्याविरुद्धच्या लढतीत त्यांना बरोबरीत समाधान मानावे लागले होते. लुका मॉडरीच, इवान पेरीसीच या अनुभवी खेळाडूंकडून त्यांना अपेक्षा आहेत. क्रोएशियाने १९९८ मध्ये तिसरा क्रमांक पटकावला होता, तसेच २०१८ मध्ये त्यांनी उपविजेतेपद पटकावले होते.

अद्याप विजय नाहीच

जपान-क्रोएशिया यांच्यामध्ये आतापर्यंत झालेल्या लढतींवर नजर टाकता काही प्रमाणात क्रोएशियाचे वर्चस्व दिसून येईल. दोन देशांमध्ये आतापर्यंत तीन लढती झालेल्या आहेत. यापैकी दोन लढती बरोबरीत राहिल्या असून एका लढतीत क्रोएशियाने बाजी मारली आहे. क्रोएशियाने १९९८ मध्ये झालेल्या लढतीत जपानवर १-० असा विजय मिळवला होता. जपानला अद्याप क्रोएशियाला पराभूत करता आलेले नाही. दोन देशांमधील उद्या होत असलेल्या लढतीत जपानला विजयाचे खाते उघडता येणार आहे. या लढतीतील विजेता ब्राझील - दक्षिण कोरिया यांच्यातील विजेत्याशी लढेल.

पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचे लक्ष्य

जपानच्या संघाने अद्याप एकदाही फिफा विश्‍वकरंडकाची उपांत्यपूर्व फेरी गाठलेली नाही. जपानने आतापर्यंत तीन वेळा अंतिम १६ फेरीत प्रवेश केला आहे, पण उप-उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा त्यांना काही ओलांडता आलेला नाही. याप्रसंगी जपानचा संघ क्रोएशियाला हरवून विश्‍वकरंडकाच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी करतो का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने