रेल्वे विकासासाठी विक्रमी गुंतवणूक; पंतप्रधान मोदी

कोलकता : रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकार विक्रमी गुंतवणूक करत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. हावडा-न्यू जलपायगुडी वंदे भारत एक्स्प्रेसचे आभासी पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. त्यावेळी पंतप्रधान बोलत होते.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राज्यपाल सी.व्ही.आनंद बोस, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आदी यावेळी उपस्थित होते. न्यू जलपायगुडीसह इतरही रेल्वे स्थानकांचा विमानतळांच्या धर्तीवर विकास करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, की आज ‘वंदे मातरम’ ची घोषणा दिलेल्या भूमीत ‘वंदे भारत’ रेल्वेचे उद्‌घाटन करण्यात आले. याच दिवशी १९४३ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान व निकोबार बेटांवर तिरंगा फडकाविला होता,त्यामुळेही हा दिवस महत्त्वाचा आहे. रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण करण्यासह विद्युतीकरणाची कामे विक्रमी वेगाने केली जात आहेत. पूर्व आणि पश्चिम मालवाहतूक कॉरिडॉर देशाच्या अर्थव्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवून आणतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.जलप्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकार नद्यांचे प्रदूषण रोखण्यावर भर देत आहे. पश्चिम बंगालमध्ये सांडपाण्याचे नवीन २५ प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यापैकी ११ प्रकल्प याआधीच पूर्ण झाले असून सात प्रकल्पांचे उद्‌घाटन होत असल्याची माहितीही त्यांनी दिली.ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांना श्रद्धांजली वाहिली. मोदी यांनी उद्‌घाटन केलेल्या पाचपैकी चार रेल्वे प्रकल्पांचे काम आपण रेल्वेमंत्री असताना सुरू झाल्याचेही त्या म्हणाल्या.

पावणेआठ तासांत ५६४ कि.मी.

ईशान्येचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या न्यू जलपायगुडीला हावडा रेल्वे स्थानकावरील २२ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरून आज सकाळी पावणेबारा वाजता सातवी वंदे भारत एक्स्प्रेस रवाना झाली. निळ्या व पांढऱ्या रंगाच्या या एक्सप्रेसमुळे इतर रेल्वेपेक्षा अंतर तीन तासांनी कमी होणार आहे. ती पावणेआठ तासांत ५६४ कि.मी. अंतर कापेल.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आपण देशाला पुढे नेण्यासाठी दूरगामी दृष्टिकोनाचा स्वीकार करू. संपूर्ण जग भारताकडे मोठ्या विश्वासाने पाहत असून जगाची ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक भारतीयाला कठोर मेहनत करावी लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने