प्रकाश आंबेडकरांना आजही ऑफर, त्यांनी तिकडे जाऊ नये; आठवलेंचं स्पष्टीकरण

नवी दिल्लीः ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात बैठका सुरु असून ते एकत्र येतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांनी साद घालत पक्षाचं अध्यक्षपद देण्याची भूमिका घेतली आहे. त्यासंदर्भातील स्पष्टीकरणही त्यांनी दिलंय.आज महापरिनिर्वाण दिनानिमित मुंबईत चैत्य भूमीवर लाखोंचा जनसमूदाय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत आहे. रामदास आठवले यांनी आज प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर भाष्य केलं आहे. सध्या प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्या रुपाने महाराष्ट्रात शिवशक्ती-भीमशक्ती पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने उभय नेत्यांमध्ये बैठका सुरु आहेत.यावरुन केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, भीमशक्ती खऱ्या अर्थाने टिकवून ठेवण्याचं काम मी केलं आहे. २०११ मध्ये बाळासाहेबांनी हाक दिल्यानंतर मी महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. आज मी भाजपसोबत आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. आमचीच खरी शिवशक्ती-भीमशक्ती आहे. प्रकाश आंबेडकरांची भीमशक्ती नसून वंचित शक्ती आहे.पुढे बोलतांना आठवले म्हणाले की, अजूनही माझ्याकडून प्रकाश आंबेडकरांना ऑफर कायम आहे. त्यांनी माझ्या पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारावं. कारण एक विचार, एक पक्ष ही काळाची गरज असून बाबासाहेबांचा पक्ष जिवंत ठेवणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने