‘रामलिंग-धुळोबा’ची वन्यजीवांना भुरळ!

 कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील रामलिंग, धुळोबा डोंगर जंगली भाग वन्यजीवांना खुणावतो आहे. गेल्या सात वर्षांत येथे एकूण सहा वेळा बिबट्या आला. दहा वेळा गवे आले. याशिवाय मोर, वानर, कोल्हे, ससे अशा वन्यजीवांचा वावर येथे आहे.येथे सागरेश्‍वरच्या धर्तीवर चांगले संरक्षित कृत्रिम अभयारण्य विकसित होऊ शकते. मात्र, मानवी वर्दळ आणि वनसंवर्धनातील दुर्लक्षामुळे वन्यजीवांचा सक्षम अधिवास निर्माण होण्यास अडथळा ठरत आहे.जिल्ह्यातील पश्चिम भागाच्या जंगलातील वन्यजीवांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. चंदगड, आजरा, भुदरगड, राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी हा भ्रमण मार्ग आहे. यातील काही बिबटे, गवे पन्हाळा जोतिबा डोंगराकडून पूर्वेकडे सादळे-मादळे जंगलापर्यंत येतात. काही दिवसाने हेच वन्यजीव सादळे मादळेतून परत पन्हाळ्याकडे जाण्याऐवजी ऊस शेतीत ठिय्या मारतात.
ऊस शेतीतून बाहेर पडण्यास मार्ग सापडला नाही, की भरकटत महामार्गाकडे येतात. तेथून शिये, टोप, संभापूर किंवा अंबप, घुणकीजवळील ऊस शेतीत लपून राहतात. कधी एखादा वन्यजीव महामार्ग ओलांडून पेठवडगाव भागाकडील ऊस शेतीत येतो.तेथून हातकणंगलेजवळील नरंदे रोपवाटिकासमोरील डोंगरातून थेट रामलिंग जंगलाकडे शिरतात. येथील हिरव्या गर्द झाडीत भटकटत राहतात. या डोंगरात दगडांच्या फारशा घळी नाहीत. जंगलातील रस्त्यांवर पर्यटकांची मोठी वर्दळ असते. गोंगाट असतो. स्थानिक वाहनांची ये-जा असते. अशा वातावरणात बिबट्या किंवा वन्यजीव फारसे तग धरत नाहीत.किरकोळ शिकार म्हणून भटकी कुत्री, जनावरांवर आठ-दहा दिवसच राहतात. पाणी पिण्यासाठी अतिग्रे तलावाच्या बाजूला येतात. पाणी पिऊन पुन्हा जंगलात जातात किंवा ऊस शेतीत राहतात. थोड्याच दिवसात हे वन्यजीव आल्या मार्गाने परत जातात.

रामलिंग, धुळोबा जंगली पट्टा ते सादळे-मादळे जंगल रस्ता २५ किलोमीटर अंतराचा आहे. एवढे अंतर रात्रीत बिबट्या, गवे यासारखे वन्यजीव पार करतात. एकंदर परिसरात वन्यजीवांचा वावर वाढला आहेवन्यजीवाचा कोणत्याही भागातील वावर असतो. तेथे नीरव शांतता असणे आवश्यक आहे, तर वन्यजीव सुरक्षित राहू शकतात, तसे पूरक वातावरण रामलिंग जंगल परिसरात आहे. मात्र, येथे जाणाऱ्या पर्यटकांनी कोणत्याही परिस्थितीत वनसंपदेचे नुकसान होणार नाही, वन्यजीव विचलित होणार नाहीत, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. तरच वन्यजीवांचा अधिवास येथे वाढू शकेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने