दिल्ली: सोनिया गांधी यांचा जन्म 09 डिसेंबर 1946 रोजी इटलीमध्ये झाला. केंब्रिज विद्यापीठात राजीव गांधींची भेट, प्रेम आणि मग लग्न हा सर्व प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुरुवातीला सोनियांच्या कुटुंबीयांना त्यांनी भारतीय मुलाशी लग्न करू नये असे वाटत नव्हते. मात्र, त्यानंतर राजीव गांधी यांनी स्वतः सोनियांच्या वडिलांची भेट घेतली आणि त्यानंतर या लग्नस होकार मिळाला.राजीव गांधींच्या सांगण्यावरून त्यांची आई इंदिरा गांधी लंडनमध्ये सोनियांना पहिल्यांदा भेटल्या. मात्र, या पहिल्या भेटीत नेमकं काय घडलं होतं? याचा उल्लेख सोनियांनी त्यांच्या चरित्रात उल्लेख केला आहे. त्याचबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
"सोनिया गांधी - अन एक्स्ट्राऑर्डिनरी लाइफ, अन इंडियन डेस्टिनी" या पुस्तकात सोनिया गांधी पहिल्या नजरेत राजीव यांच्या प्रेमात पडल्याच उल्लेख आहे. भेटी गाठी वाढल्यानंतर दोघांमध्येही प्रेम फुलण्यास सुरूवात झाली. या दरम्यानच्या काळात राजीव आई इंदिरा गांधींना पत्र लिहित असत. यामध्ये ते कॅम्पस, अभ्यास, जीवन आणि दिनचर्या या सर्व गोष्टींबाबत लिहित असत. त्यानंतर राजीव यांनी पत्रात सोनियांचा उल्लेख करण्यास सुरूवात केली.
अन् लंडनमध्ये पहिल्यांदा झाली भेट
पत्रातून राजीव स्वतःबद्दल खुशाली कळवत असत तसेच सोनियांचा उल्लेख त्यांनी करण्यास सुरुवात केली होती. एकेदिवशी राजीव यांनी पत्रात सोनिया गांधींविषयी मनातील भाव व्यक्त केले. तसेच इंदिरा गांधी आणि सोनियांची भेटीचे नियोजन केले. त्यावेळी इंदिरा लाल बहादूर शास्त्रींच्या सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री होत्या. या भेटीदरम्यान सोनिया खूप घाबरल्या होत्या. सोनिया आणि इंदिरा यांच्यातील ही भेट लंडनमधील केनिंग्टन पॅलेस गार्डनमधील भारतीय उच्चायुक्तांच्या घरी पार पडली होती.
इंदिरांनी फ्रेंचमध्ये साधला संवाद
पहिल्या भेटीदरम्यान सोनिया गांधी खूप घाबरल्या होत्या. या भेटीत इंदिरांनी सोनियांना मोकळेपणाने बोलण्यास सांगितले. सोनिया इंग्रजीपेक्षा फ्रेंचमध्ये बोलणे अधिक सोयीचे होते. ही बाब लक्षात घेत इंदिरांनी या भेटीदरम्यान सोनियांशी फ्रेंचमध्ये संवाद साधला. यावेळी त्यांनी अभ्यासासह इतर गोष्टींबाबत विचारपूस केली. सोनिया आणि राजीव यांच्यातील हे नाते जेवढे गांधी घराण्याला जवळचे वाटत होते. तेवढे सोनियांच्या घरच्यांना वाटत नव्हते. त्यामुळे सोनियांच्या घरच्यांनी सुरूवातीला या नात्याला स्पष्ट नकार दिला होता. मात्र, त्यानंतर राजीव यांनी इटली येथे जाऊन सोनियांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यानंतर दोघांच्या लग्नाला होकार देण्यात आला.