राज्यशास्त्राचा संशोधक विद्यार्थी झाला सरपंच

 कोल्हापूर: सद्यःस्थितीत राजकारणाचा शास्त्रीयदृष्ट्या होणारा अभ्यास आणि प्रत्यक्ष राजकारण यामध्ये फार फरक आहे. मात्र, राजकारणाचे ‘ॲकॅडमिक’ धडे घेताना फार थोडे जण प्रत्यक्ष राजकारणात उतरतात. परंतु तळसंदे येथील राज्यशास्त्र विषयात संशोधन करणारा संदीप गीता अर्जुन पोळ हा विद्यार्थी अपवाद ठरला असून त्याने कमाल करत थेट लोकनियुक्त सरपंचपदी झेप घेतली आहे.कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील तळंदगे गावाची मतसंख्या चार हजारवर आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत तीन पॅनेलने समोरासमोर उभे ठाकल्याने निवडणूक अधिकच रंजक होत गेली. एकूण १३ जागांसाठी निवडणूक पार पडली. यामध्ये २४० मतांनी विजय मिळवीत अगदी पहिल्याच प्रयत्नात संदीप यांना गावकऱ्यांनी थेट सरपंचपदी निवडून दिले, त्यांच्या पॅनेलचे चार सदस्यही निवडून आले.

आयटी क्षेत्र ते स्पर्धा परीक्षा आणि राजकारण...

आयटी हब असलेल्या पुण्यात संदीप पोळ हे चांगल्या पगारावर नोकरी करीत होते. सामाजिक जाणिवा समृद्ध असलेल्या संदीपचे मन मात्र त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. आयटीतील नोकरी सोडून राज्यशास्त्रात त्यांनी ‘एमए’ केले.स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला, मात्र फार थोड्या गुणांनी अधिकारी होण्याची संधी हूकली. परंतु, पुन्हा नव्या दमाने राज्यशास्त्रात संशोधनाचा निर्णय घेतला. सोबतच पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेचे शिक्षणही घेतले. ‘यूजीसी’च्या नेट परीक्षेत फेलोशिप मिळविली. संशोधन करताना पुण्यात स.प.महाविद्यालयात अध्यापनाचे काम केले.यानंतर गावी परतून गावाच्या विकासासाठी पुढाकार घेण्यास प्रारंभ केला. अनेक प्रश्‍नांना हात घातला, ते तडीस नेण्यासाठी प्रशासकीय स्तरावर आपल्या स्पर्धा परीक्षा अभ्यासाचे चातुर्य वापरले. एक उच्चशिक्षित तरुण पुढाकार घेत असल्यामुळे ग्रामस्थांचे त्यांना समर्थन मिळाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने