सीमावादावर तोडग्याचा मुहूर्त ठरला! मविआ-अमित शहांच्या भेटीत काय घडलं?

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासह गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरुन राज्यात मोठं वादंग निर्माण निर्माण झालं होतं. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या खासदारांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याची विनंती केली. यानंतर शहांनी सकारात्मक भूमिक घेतल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.  खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अमोल कोल्हे, विनायक राऊत, राजन विचारे, अरविंद सावंत आदींनी शहांची भेट घेतली. भेटीनंतर मीडियाशी बोलताना सुळे म्हणाल्या, कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद, कर्नाटकचे मुख्यमंत्र्याचं प्रक्षोभक विधान, छत्रपतींच्याबद्दल सरकारमधील लोकांची बेतालं विधानं, सत्तेतील वाचाळवीर तसेच राज्यपाल जे काही बोललेत त्याबद्दल आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून शहांना माहिती दिली आहे.मला विश्वास आहे की गृहमंत्री अमित शहा काहीतरी मार्ग काढतील. गुजरातचा शपथविधी झाल्यानंतर काहीतरी मार्ग काढला जाईल असं त्यांनी सांगितलंय. त्यामुळं माझा विश्वास आहे की यामध्ये केंद्राचा लवकरच हस्तक्षेप होईल. आम्हाला विश्वास आहे की, गृहमंत्री पक्षपातीपणा करणार नाहीत. त्यामुळं पुढच्या आठवड्यात काय होतंय ते पाहुयात.संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होऊन तीन दिवस झाले पण सत्तेत असलेल्या कोणत्याही खासदारानं महाराष्ट्र, छत्रपती, समीवाद या विषयावर सभागृहात बोललेलं मला दिसलं नाही. त्यामुळं अतिशय असंवेदनशीलपणे हे ईडीचं सरकार वागतंय. सीमावादावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली पाहिजे, अशी माझी सुरुवातीपासूनची मागणी आहे. पण आत्ताचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विरोधीपक्षांना विश्वासात घेऊन कृती करताना दिसत नाही. ते कुठलाही स्टॅड घेत नाहीत हे दुर्देवी आहे, अशा शब्दांत सु्प्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने