अरेरावीची भाषा, कडाक्याचं भांडण अन्… अपूर्वा-आरोहच्या वादात राखी सावंतने केलं असं काही की पाहतच राहिले सगळे!

मुंबई: ‘मराठी बिग बॉस सीझन ४’ मध्ये राखी सावंतची एंट्री झाल्यापासून रोज काही ना काही नवीन पाहायला मिळत आहे. घरातील सदस्यांमध्ये रोज भांडणं होताना दिसत आहे. आता महाअंतिम सोहळ्याला काही दिवस उरले असताना वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून आलेल्या राखी सावंतने घरात स्वतःचा वेगळाच दबदबा निर्माण केलेला दिसत आहे. अशात नुकतंच अपूर्वा नेमळेकर आणि आरोह वेलणकर यांच्या भांडणात राखीने असं काही केलं की सर्वांनाच धक्का बसला आहे.
कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून बिग बॉस मराठी ४ चा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यात आरोह वेलणकर आणि अपूर्वा नेमळेकर यांच्या कोणत्या तरी कारणाने जोरदार भांडण सुरू असल्याचं दिसत आहे. आरोह अपूर्वाला बरंच काही बोलताना दिसत आहे आणि ती देखील त्याच्याशी अरेरावीच्या भाषेत बोलताना दिसत आहे. पण हा व्हिडीओ मात्र राखी सावंतमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.

या व्हिडीओमध्ये आरोह वेलणकर, “स्वतःला कोण समजतेस तू नेमळेकर?” असं ओरडून बोलताना दिसते. त्यावर अपूर्वा त्याला, “तू कोण आहेस ना ते पाहा आधी तू मला काय सांगतोस.” असं म्हणते. अपूर्वाचं बोलणं ऐकून चिडलेला आरोह, “चल चल निघ.” असं म्हणतो. नंतर अपूर्वाही त्याला, “स्वतः काय बोलतो, हड-तूडची भाषा करतो.” असंही म्हणते. तिच्या बोलण्यावर आरोह तिला, “फालतू बाई आहेस तू, मूर्ख बाई आहेस एक नंबरची.” असं म्हणतो.

या दोघांच्या भांडणात आरोहने, अपूर्वाला ‘फालतू बाई’ असं म्हटलेलं ऐकून चिडलेली राखी सावंत रागाच्या भरात आरोहच्या तोंडावर पाणी फेकते आणि म्हणते, “फालतू बाई, कधीही म्हणायचं नाही.” असं त्याला ठणकावून सांगते. राखीचं हे वागणं पाहून अपूर्वालाही धक्का बसतो. तर आरोहचा चेहराही पाहण्यालायक होतो. राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामुळे तिचं कौतुकही होताना दिसत आहे.
टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने