कोरोनाची धास्ती; पर्यटनास फटका

कोल्हापूर : कोरोनाची लाट येईल का नाही, याबाबत तर्कवितर्क आहेत; पण चीनमध्ये कोरोनाच्या साथीचा फटका भारतातील पर्यटन क्षेत्राला बसत आहे. काही देशांनी येताना आणि जातानाही कोरोना चाचणी अनिवार्य केल्याने ऐन पर्यटनाच्या हंगामात परदेशी बुकिंग रद्द होत आहेत.त्याचा मोठा फटका ट्रॅव्हल्स एजन्सी व पर्यटकांना बसत आहे.डिसेंबर ते फेबुवारी हा देशांतर्गत, तसेच परदेशवारीसाठी पर्यटनाचा हंगाम असतो. पर्यटनासाठी विमान व त्या देशातील इतर खर्च कमी असल्याने अनेकांनी दोन-तीन महिन्यांपूर्वी बुकिंग केले आहे.काही सहली परदेशात पोहोचल्या आहेत. तोपर्यंत चीनमध्ये कोरोनाची लाट सुरू झाली आहे. या लाटेची तीव्रता आणि खरोखरच गंभीर आहे का? याविषयी अजून खात्री नाही. तोपर्यंत इतर देशांनी पर्यटकांना येता व जाताही एचआरसीटी चाचणी सक्तीची केली आहे. एकवेळ भारतातून जाताना एचआरसीटी चाचणी करणे शक्य आहे;पण परदेशातून येताना चाचणी केली आणि त्यात संबंधित रुग्ण कोरोनाबाधित आढळला, तर दहा दिवस अलगीकरण करण्याची सक्ती काही देशांनी घातली आहे. या भीतीने अनेकांनी केलेले बुकिंग रद्द केले आहे.अचानक सहल रद्द झाल्यानंतर विमान कंपन्यांनीही हात वर केले आहेत. विमान कंपनीमुळे सहल रद्द झाली, तर त्याची भरपाई देऊ; पण स्वतःहून पर्यटकांनीच सहल रद्द केली, तर त्याचा शंभर टक्के परतावा मिळणार नाही, असे विमान कंपन्यांकडून सांगण्यात येते.परिणामी बुकिंग केलेल्या पर्यटकांना सहल रद्द केल्यानंतर मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. देशांतर्गत कोरोनाची साथ संपल्याने व देशातील शंभर टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाल्याने देश-विदेशातील सर्वच सहली ‘हाऊसफुल्ल’ आहेत.विदेशातील अनेक पर्यटन स्थळे खुली झाल्याने तिकडेही लोकांची ओढ वाढली असतानाच काही देशांत कोरोना विषयीच्या नियमांची अंमलबजावणी होत असल्याने ऐन हंगामात पर्यटन क्षेत्रात धास्ती निर्माण झाली आहे.

अफवांवर विश्‍वास ठेवू नये

देश-विदेशातील पर्यटनाला चांगल्या प्रकारे उभारी येत आहे. त्यामुळे पर्यटकांनी कोरोनाची धास्ती व अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष बळीराम वराडे यांनी केले आहे.आंतरराष्ट्रीय पर्यटन विषयक नियमावली पर्यटकांना सांगितली जाईल, आरटीपीसीआर हा पर्यटनावरून आल्यावर केला जाईल, त्यामुळे पर्यटकांनी विनाकारण भीती बाळगू नये, असेही आवाहन वराडे यांनी केले.

दृष्टिक्षेपात

  • बुकिंग रद्द केल्यानंतर मोठा आर्थिक भुर्दंड

  • काही देशांच्या अलगीकरणाची भीती

  • येता-जाताही एचआरसीटी चाचणी सक्तीने अडथळा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने