मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करणार आहेत. यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी त्यांना काही सवाल केले आहेत तसेच सल्लाही दिला आहे.मोदींनी कर्नाटकव्याप्त महाराष्ट्राला काय दिलासा देणार ते आधी सांगाव त्यानंतर शिवसेनाप्रमुखांच्या नावाच्या महामार्गाचं उद्घाटनं करावं, असं म्हटलं आहे.मराठवाडा साहित्य संमेलनात उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, पंतप्रधानांनी उद्या जरुर यावं त्यांनी आमचे कानही टोचावेत तो त्यांचा अधिकार आहे. पण कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आणि यावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची जी अरेरावी सुरु आहे. त्यावरही तुम्ही सणकून बोललचं पाहिजे. महाराष्ट्र-कर्नाटक प्रश्नावरील भूमिकेची महाराष्ट्र वाट पाहतो आहे.
समृद्धी महामार्ग होणार तो झालाच पाहिजे. माझी राजधानी आणि उपराजधानी जवळ आणणारा तो महामार्ग आहे. त्याचं काम आमच्या काळात आम्ही अधिक वेगानं केलं आहे. ते रस्ते होतील आणि ते केलेच पाहिजेत.पण एका मोठ्या रस्त्याचं उद्घाटन करत असताना कर्नाटकनं महाराष्ट्राचे रस्ते बंद केले असतील तर पंतप्रधान म्हणून त्यांना काय बोलणार आहात आणि महाराष्ट्राला काय दिलासा देणार असाल ते आधी सांगा. मग शिवसेनाप्रमुखांच्या नावाच्या त्या महामार्गाचं उद्घाटन करा, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना सुनावलं आहे.
सीमाप्रश्नासाठी स्वतः शिवसेनाप्रमुख तीन महिने तुरुंगात राहिले होते. शिवसेनेची स्पष्ट भूमिका बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालीच पाहिजे हीच होती. पण आज बाळासाहेबांची शिवसेना म्हणून तुमच्या ढेंगेखाली जाऊन आलेली लोकं आहेत त्यांनी देखील त्यांची भूमिका काय आहे हे सुद्धा आज स्पष्ट झालं पाहिजे, अशी भूमिकाही यावेळी उद्धव ठाकरेंनी मांडली.