कोल्हापूरातील ब्राझीलप्रेमी हळहळले! चौका-चौकांतील स्क्रीनने आणली रंगत

कतार : कतार येथे सुरू असलेल्या फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेत ब्राझील आणि क्रोएशिया यांच्या सामन्यातील थरार आज रात्री कोल्हापूरकरांनी अनुभवला. डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे शहरातील रंकाळा टॉवर, खासबाग चौक, उभा मारुती चौक, शनिवार पेठ आदी आठ ठिकाणी विश्वकरंडक फुटबॉल सामने पाहण्यासाठी स्क्रीन उभारण्यात आले होते. ब्राझील संघाच्या पाठीराख्यांनी तेथे एकच गर्दी केली होती. शिट्ट्या, आरोळ्यांनी जल्लोष वाढत होता.शहरातील तापमानाचा पारा खाली जात असताना फुटबॉल विश्वचषकाचे सामन्याने गर्मी वाढवली. कोल्हापूर फुटबॉलवेडे शहर म्हणून ओळखले जाते. संपूर्ण शहर फुटबॉलच्या रंगात न्हाऊन निघाले आहे. यासाठीच येथील फुटबॉलप्रेमींसाठी विविध ठिकाणी सामना लाइव्ह पाहण्यासाठी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती.

सामना पुढे सरकेल, तसा फुटबॉलप्रेमींची धाकधूक वाढत होती. अशातच सामना अत्यंत चुरशीचा ठरल्याने सामन्याचा निकाल कोणाच्या दिशेने जाईल, याचे वाद-प्रतिवाद होतच राहिले. मात्र, पूर्ण वेळ दोन्ही संघांमधील विजयाच्या झुंजीने फुटबॉलप्रेमींना खिळवून ठेवले. अखेर सामन्यात क्रिएशिया संघाने ४- २ गोलफरकाने विजय मिळविला व ब्राझील समर्थकांच्या पदरी निराशा पडली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने