भारत जोडो यात्रेला पुन्हा ब्रेक; 'हे' कारण देत राहुल गांधींची पदयात्रा केली रद्द

जम्मू-काश्मीर:  जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळं रस्ता बंद झाला आहे. त्यामुळं भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा रद्द करण्यात आला आहे.तर, दुसरीकडं काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट केलंय की, खराब हवामान आणि भूस्खलनामुळं रामबन आणि बनिहालमधील भारत जोडो यात्रेचा दुपारचा टप्पा रद्द करण्यात आला आहे. उद्या प्रजासत्ता दिन असून परवा 27 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता पदयात्रा पुन्हा सुरू होईल, असं त्यांनी सांगितलंय.काँग्रेसच्या वेळापत्रकानुसार, ही यात्रा 25 जानेवारीला सकाळी 8 वाजता मैत्र रामबन येथून सुरू झाली, ती खोबाग इथं थांबून दुपारी 2 वाजता हरपुरा बनिहालला रवाना होणार होती. जम्मूहून प्रवास केल्यानंतर मंगळवारी राहुल गांधी उधमपूरला पोहोचले, तेव्हाही पाऊस सुरूच होता. भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये पोहोचल्यानंतर 30 जानेवारीला संपणार आहे.एक दिवसापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधींनी पुलवामा हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईकवरील दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यापासून स्वतःला दूर केलं होतं. राहुल गांधी म्हणाले, दिग्विजय सिंह जे बोलले त्यांच्याशी मी सहमत नाही. माझा लष्करावर पूर्ण विश्वास असल्याचं राहुल गांधी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने