'इंग्रज महात्मा गांधींना नाही, तर सुभाषचंद्र बोस यांना घाबरायचे'; केंद्रीय मंत्र्यानं सांगितलं कारण

मुंबई : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांनी त्यांना अभिवादन केलं. द्रौपदी मुर्मू यांनी ट्विटव्दारे त्यांना आदरांजली अर्पण केली.मुर्मू यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, स्वातंत्र्यसैनिक वीर सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! सुभाषचंद्र यांची संघर्षमय जीवनगाथा म्हणजे धैर्य, त्याग आहे. सर्व देशवासियांनी वीर सुभाषचंद्र यांसारख्या राष्ट्रीय वीरांबद्दल जाणून त्यांची प्रेरणा घ्यावी. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलंय.सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यांचं स्मरण केलं. कोलकाता येथील आयोजित कार्यक्रमात ठाकूर म्हणाले, 'नेताजींनी भारतीय नागरी सेवा सोडली, जेणेकरून ते स्वातंत्र्य चळवळीत सामील होऊन इंग्रजांविरोधात उभं राहतील. आयसीएस सेवा आजच्या आयएएस सेवेच्या बरोबरीनं आहे. पण, ती नोकरी सोडून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला.'

ठाकूर पुढं म्हणाले, नेताजींनी आयसीएस सोडून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वत:ला झोकून दिलं. इंग्रजांविरुद्ध नेताजी एकटे उभे राहिले. इंग्रज म्हणायचे, आम्ही महात्मा गांधींना घाबरत नाही तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांना घाबरतो. बंगालच्या मातीनं अनेक स्वातंत्र्यसैनिक घडवले, त्यामुळंच इंग्रजांना बंगाल सोडून दिल्लीला जावं लागलं. सुभाषचंद्र बोस यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे, असं त्यांनी नमूद केलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने