दक्षिण पूर्व आशियातील बाजारपेठांच्या सुटीमुळे कांद्याच्या निर्यातीवर मर्यादा!

नाशिक : उन्हाळ कांदा संपला असताना नवीन लाल कांद्याच्या भावात स्थानिक बाजारपेठेतील घसरण थांबण्याचे नाव घेईना. ९ जानेवारीपर्यंत क्विंटलला दीड हजारांहून अधिक भाव मिळत होता. तो हळूहळू कमी होत आज लासलगावमध्ये १ हजार ३००, तर पिंपळगावमध्ये १ हजार २५० रुपये क्विंटल या सरासरी भावाने कांद्याची विक्री झाली.ही स्थिती नेमकी का उदभवली याची माहिती घेतल्यावर दक्षिण पूर्व आशियातील बाजारपेठांना सुटी असल्याने निर्यातीवर मर्यादा आल्याने भावात घसरण झाल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे. 

लासलगाव बाजारात जानेवारीमध्ये क्विंटलला यापूर्वी मिळालेला सरासरी भाव रुपयांमध्ये असा : २०१८-१९-५६१, २०१९-२०-३ हजार ६१०, २०२०-२१-२ हजार ५६१, २०२१-२२-२ हजार ११५. लासलगावमध्ये नवीन वर्षात १ हजार ४५१ रुपये भाव मिळाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी हाच भाव १ हजार ५२५ रुपये होता.तसेच पिंपळगावमध्ये बसवंतमध्ये दीड हजार रुपये क्विंटल या सरासरी भावाने कांदा विकला जात असताना २१ जानेवारीला १ हजार २५० रुपये अशी घसरण झाली. २३, २४, २५ जानेवारीला तेराशे रुपये असा भाव राहिला. दरम्यान, पश्‍चिम बंगालमधील सुखसागर पट्यातील नवीन कांदा बाजारात दाखल होऊ लागला आहे.तसेच हा कांदा बांगलादेशकडे रवाना होत आहे. त्यामुळे राज्यातील कांद्याची बांगलादेशमधील कांद्याची निर्यात मंदावली आहे. राजस्थानचा कांदा संपत आला असून मध्यप्रदेशातील लाल कांद्याची आवक कमी झाली असून मार्चमध्ये गावठी कांदा बाजारात येण्यास सुरवात होईल.त्याचबरोबर चाकण भागातून नवीन कांदा बाजारात दाखल होण्यास सुरवात झाली आहे. या कांद्याची आवक वाढताच, निर्यातीसाठी व्यापाऱ्यांचा कल त्याकडे अधिक राहण्याची शक्यता आहे. ही सारी परिस्थिती पाहता, नाशिकच्या कांद्याची मदार आता निर्यातीवर आहे.देशातंर्गत कांदा बिहार, ओडीसा, आगारतळा, मिझोरम, त्रिपुराकडे विक्रीसाठी रेल्वेने रवाना होत आहे. मलेशिया, सिंगापूर, फिलीपाइन्स, व्हिएतनामच्या बाजारपेठांना सुटी मिळण्यापूर्वी तेथील आयातदारांनी मोठ्याप्रमाणात कांद्याची खरेदी केली होती. त्यामुळे गेल्या दीड आठवड्यांपासून पाच ते दहा टक्के कांदा निर्यातीसाठी पाठवला जात आहे. पाकिस्तानच्या ग्राहकांसाठी दुबईमार्गे कांदा रवाना होत आहे.

कांद्याच्या निर्यातीचे भाव (आकडे टनाला डॉलरमध्ये)

० दुबई-२७०
० ओमाना-२९०
० बांगलादेश-२५० (दहा दिवसांपूर्वी २९० ते २९५)
० सिंगापूर-२९०
० मलेशिया-२५०
० व्हिएतनाम-२६५

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने