१०० कोटींचा घोटाळा, रेमडेसिवीर अन् ठाकरे...; किरीट सोमय्या आक्रमक

मुंबई: कोरोना काळात मुंबईमध्ये जम्बो कोविड सेंटरसंदर्भात झालेल्या घोटाळ्यांबाबत किरीट सोमय्या पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसंच त्यांच्या अटकेची मागणीही केली आहे.किरीट सोमय्या आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारच्या कार्यकाळात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. सोमय्या म्हणाले, "१०० कोटींचा घोटाळा करणारे सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे पार्टनर आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. ७ वर्षांची शिक्षा होऊ शकतो, असा गुन्हा आहे. २० नोव्हेंबर २०१० रोजी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली."सोमय्या पुढे म्हणाले, "त्यावेळी दोन सदस्यांची समिती नेमली होती. तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. २२ जुलै २०२२ ला निर्णय देण्यात आला. त्याबद्दल लोकायुक्तांनी स्पष्ट सांगितलं होतं. क्लिनचिट दिली हे अर्धसत्य आहे. तेव्हा मुंबई आणि भाईंदर महानगरपालिकेकडे अधिकार होते, महाराष्ट्र सरकारकडे अधिकार होते. "रेमडेसिविर प्रकरणाबद्दलही किरीट सोमय्या यांनी काही गंभीर आरोप केले आहे. रेमडेसिवीरचे दर कमी का केले नाहीत, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. रेमडेसिवीरचा घोटाळा ठाकरे सरकारने केला होता. त्याच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढवल्या होत्या. याची चौकशी झाली पाहिजे. हा दरांच्या संदर्भातला गोंधळ महापालिकेत नाही, तर ठाकरे सरकारमध्ये झाला होता, असा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.उद्धव ठाकरेंनी हजारो कोविड रुग्णांशी खेळण्याचं पाप केलं आहे. कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी सुजित पाटकर यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. त्यासंदर्भात आपण उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्याशी बोललो आहोत, ते यावर योग्य निर्णय देतील, असं आश्वासही दिल्याचं सोमय्या यांनी सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने