आफताबने 'या' हत्याराने केले श्रद्धाच्या शरीराचे 35 तुकडे; शवविच्छेदन अहवालात मोठा खुलासा

दिल्ली: दिल्लीतील श्रद्धा हत्याकांड प्रकरणी एक महत्त्वाचा खुलासा समोर आलाय. जंगलातून सापडलेल्या श्रद्धाच्या हाडांच्या शवविच्छेदनात आफताबनं लोखंडी करवतीनं मृतदेहाचे तुकडे केल्याचं उघड झालंय.पोलिसांना जंगलातून सापडलेल्या 23 हाडांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या  आधारे हा अहवाल तयार करण्यात आलाय. पोस्टमार्टम रिपोर्टच्या विश्लेषणादरम्यान सर्व हाडं करवतीनं कापल्याचं आढळून आलंय. विश्लेषणानंतर एम्सनं मंगळवारी हा अहवाल पोलिसांना सुपूर्द केला. आता याप्रकरणी पोलीस जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात साकेत न्यायालयात दोषारोपपत्र सादर करणार आहेत.दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपी आफताबला अटक करून त्याची चौकशी केली. यादरम्यान पोलिसांनी आरोपीच्या सूचनेवरून गुरुग्राम आणि मेहरौलीच्या जंगलातून एकूण 23 हाडं जप्त केली. या सर्व हाडांचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं. त्याचवेळी एम्समध्ये या हाडांच्या पोस्टमार्टम रिपोर्टचं विश्लेषण करण्यात आलं. आरोपी आफताबनं करवतीनं संपूर्ण शरीर कापल्याची माहिती समोर आलीये.



हाडांवर दिसल्या करवतीच्या खुणा

करवतीनं काहीही कापलं तर त्यावर करवतीच्या खुणा राहतात. कापलेला भाग थोडा खडबडीत राहतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाच्या हाडांवरही अशाच खुणा आढळल्या आहेत. अशा स्थितीत सर्व हाडांचं विश्लेषण केल्यानंतर संपूर्ण शरीर करवतीनं कापल्याचं डॉक्टरांनी मान्य केलं.

हाडांचा डीएनए झाला मॅच

पोलिसांनी सांगितलं की, मेहरौली आणि गुरुग्राममधील वेगवेगळ्या ठिकाणांहून जप्त केलेल्या हाडांचे डीएनए गेल्या महिन्यातच करण्यात आले होते. या हाडांचा डीएनए रिपोर्ट श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएशी जुळला होता. या सर्व हाडांची डीएनए मॅच झालीये. शिवाय, फ्लॅटमध्ये सापडलेल्या रक्ताच्या डागांच्या डीएनएशी हाडांचा डीएनएही जुळला आहे. लिव्ह-इन पार्टनर आफताबनं 10 मे रोजी श्रद्धाची हत्या केली आणि त्यानंतर दोन दिवसांत मृतदेहाचे 35 तुकडे केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने