शाहरुख खानच्या ‘पठाण’बाबत अजय देवगणचं विधान, म्हणाला “कोणताही चित्रपट…”

मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट उद्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच चित्रपटांचे रेकॉर्ड मोडायला सुरुवात केली आहे. अडव्हान्स बुकिंगमधून तब्बल २४ कोटींची कमाई शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने केली आहे.शाहरुख खानच्या ‘पठाण’ची क्रेझ संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. ‘पठाण’च्या प्रदर्शनाआधीच्या रेकॉर्ड ब्रेक कमाईवर बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने प्रतिक्रिया दिली आहे. अजय देवगणच्या ‘भोला’ चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित झाला. ‘भोला’च्या टीझर कार्यक्रमादरम्यान अजय देवगणने पठाणबाबत भाष्य केलं. “कोणताही प्रदर्शित होणारा चित्रपट सुपरहिट व्हावा, अशीच माझी इच्छा आहे. शेवटी मनोरंजन विश्व एकच आहे. ‘पठाण’ चित्रपटासारखं अडव्हान्स बुकिंग आजपर्यंत कोणत्याच चित्रपटाचं झालेलं नाही. त्यामुळे मी स्वत: खूश आहे”, असं तो म्हणाला.अजय देवगणचा हा व्हिडीओ शाहरुख खानने त्याच्या ट्वीटवरुन शेअर केला आहे. “अजय आत्तापर्यंत नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहिला आहे. मी व माझ्या कुटुंबियांप्रती त्याने नेहमीच प्रेम व्यक्त केलं आहे. अजय देवगण एक उत्कृष्ट अभिनेता व व्यक्ती आहे”, असं शाहरुख खानने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.शाहरुख खान ‘पठाण’ चित्रपटातून तब्बल चार वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनाही या चित्रपटाबाबत उत्सुकता आहे. या चित्रपटात शाहरुख खानबरोबर दीपिका पदुकोण व जॉन अब्राहमही मुख्य भूमिकेत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने