“तो स्वतंत्र खेळला नाही…” अक्षय केळकरच्या बिग बॉस विजेतेपदावर अमृता धोंगडेची प्रतिक्रिया

मुंबई:  बिग बॉस मराठीचं चौथं पर्व संपून आता आठवडा पूर्ण होत आला आहे. यंदाच्या या विजेतेपदावर अक्षय केळकरने आपलं नाव कोरलं. अंतिम पाच स्पर्धकांमध्ये अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, किरण माने आणि राखी सावंत उरले होते. पण अखेर अक्षय केळकर या पर्वाचा विजेता ठरला. त्यावर आता अमृता धोंगडेने प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय केळकरच्या विजेतेपदाबाबत अमृता धोंगडेने स्पष्ट मत मांडलं आहे.अमृता धोंगडे नुकतीच ‘एबीपी माझा’च्या इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी तिने स्वतःचा बिग बॉसच्या घरातील प्रवास उलगडून सांगितला. तसेच बॉसच्या घरातील सदस्यांबद्दल आपलं मत मांडलं. यावेळी तिला ‘बिग बॉस मराठी ४’चा विजेता अक्षय केळकरच्या विजेपदाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तिने अक्षयच्या विजेतेपदावर आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं.



अक्षय केळकरला बिग बॉसचं विजेतेपद का मिळालं? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अमृता म्हणाली, “तो स्वतंत्र खेळला नाही असं मला पहिल्यापासूनच वाटत होतं. मी अनेकदा ते बोलूनही दाखवलं होतं. ते सगळे नेहमीच ग्रुपमध्ये खेळायचे. तो आणि अपूर्वा एकत्र खेळायचे. पण प्रत्येकामध्ये काही ना काही चांगले गुण असतात. तसे त्याचेही होते जे बिग बॉसच्या विजेतेपदासाठी त्याला फायद्याचे ठरले असावेत. तो टास्क खूप चांगले खेळायचा आणि त्याचं घरातील सर्वांशी चांगलं पटायचं. अर्थात सगळ्यांचे सगळ्यांशी वाद झाले पण तरीही त्याचं सर्वांशी चांगले संबंध होते.”दरम्यान बिग बॉस मराठीचा चौथं पर्व संपून आता आठवडा उलटून गेला तरीही या पर्वाची चर्चा होताना दिसत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरलेल्या अक्षयला ट्रॉफी बरोबरच १५ लाख ५५ हजार रुपये रोख रक्कम मिळाली. याशिवाय त्याला  पु.ना.गाडगीळ आणि सन्स तर्फे १० लाख रुपयांचे बंपर गिफ्ट व्हाउचर आणि बेस्ट कॅप्टन ॲाफ सीझनसाठी पाच लाख रुपये मिळाले. अक्षयने या रक्कमेत कुटुंबियांसाठी घर घेणार असल्याची इच्छा व्यक्त केली होती. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने