रशियन आर्मी म्युझियममध्ये आहे एका भारतीय सैनिकाचा फोटो; इतिहास जाणून घ्या!

रशिया:  भारतीयांची छाती अभिमानाने फुगेल असे अनेक पराक्रम भारतीय सैनिक नेहमीच करत असतात. त्यातील काही गोष्टी लगेचच व्हायरल होतात तर काही वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहतात. त्यापैकीच एक घटना काही दिवसापूर्वी समोर आली होती. ती म्हणजे एका भारतीय सैनिकाने केलेल्या मदतीमुळे रशियन लष्कराने त्यांचा अनोख्या पद्धतीने सन्मान केला आहे.रशियाच्या लष्कराच्या संग्रहालयात एका भारतीय सैनिकाचा फोटो लावण्यात आला आहे. त्या अमर जवानाचे नाव हवालदार गजेंद्र सिंह असे आहे. उत्तराखंडमधील पिथोरागढ जिल्ह्यातील बदलू या गावातील ते रहिवासी होते. त्यांनी कधी रशियाची कोणत्या प्रकारे मदत केली?, काय होता तो किस्सा आज जाणून घेऊयात.

तर त्याच झालं असं की, हवालदार गजेंद्र सिंह हे 1936 मध्ये ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी चकवाल आताचे रावळपिंडी, पाकिस्तान येथे लष्करी प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणानंतर त्यांना रॉयल इंडियन आर्मी सर्व्हिस कॉर्प्समध्ये नियुक्त करण्यात आले. आता पाकिस्तानचा खैबर पख्तूनख्वा प्रदेश असलेल्या वायव्य सरहद्द प्रांतात त्यांनी देशसेवा केली.दुसऱ्या महायुद्धाच्या काळात परिस्थिती हाताबाहेर जातेय असे दिसताच रशियाने भारताकडे मदत मागितली होती. त्या युद्धात मदतीसाठी गजेंद्र सिंह हे इराकमधील बसरा येथे तैनात होते. सिंह यांना वाळवंटी प्रदेशातून अन्नधान्य, शस्त्रे आणि दारूगोळा सैन्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तैनात करण्यात आले होते. ते रशियन सैन्याच्या खाण्यापिण्याची काळजी घेत होते.1943 मध्ये या दरम्यानच्या काळात एका रात्री शत्रू सैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात गजेंद्र सिंग गंभीर जखमी झाले. युद्धतळावर असलेल्या डॉक्टरांनी त्यांना भारतात परत जाण्याचा सल्ला दिला. तशी सोयही होती. पण, तरीही सिंग यांनी कामावर तत्पर राहण्याचा निर्णय घेतला. औषधोपचार घेतल्याने बरे झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या बटालियनमध्ये सामील झाले. ते सोव्हिएत सैन्याला गरजेच्या गोष्टींचा पुरवठा करत राहिले.गजेंद्र सिंह यांच्या या समर्पणामुळे जुलै 1944 मध्ये सोव्हिएत सैन्याने 'ऑर्डर ऑफ द रेड स्टार' देऊन सन्मानित केले. यादरम्यान तामिळनाडूचे सुभेदार नारायण राव यांनीही रेड स्टारने त्यांना सन्मानित केले होते.त्यानंतर काही दिवसांपूर्वीच सिंह यांच्या फोटोचा मॉस्कोमधील रशियन आर्मी म्युझियममध्ये समावेश करण्यात आला. भारतीय दूतावासाने याबाबतची माहिती सिंह यांच्या कुटुंबियांना दिली. यावेळी, भारतीय दुतावासाचे अधिकारी डीबी व्यंकटेश वर्मा यांनी स्वाक्षरी केलेले एक पत्र दिले. ज्यात गजेंद्र सिंह यांचा संग्रहायलातील फोटो ही भारतासाठी अभिमानाची बाब असून ही गोष्ट म्हणजे भारत आणि रशियन फेडरेशन यांच्यातील मैत्रीचा पुरावा असल्याचेही या पत्रात म्हटले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने