मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत सध्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या जम्मू -कश्मिरमध्ये आहे. यात्रेतून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. महाविकास आघाडी स्थापन होऊ शकते. एकनाथ शिंदे भाजपसोबत सरकार स्थापन करुन शकतात. तर महाराष्ट्राच्या राजकारणात सर्व शक्य आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे २०२४ ला उद्धव ठाकरे यांची शिवसेना भाजप सोबत जाईल का?, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला.
संजय राऊत म्हणाले, "असे भाकितं वर्तवली, कोणी काही बोललं तरी माझा या सर्व भविष्यावर या क्षणी विश्वास नाही. काल नरेंद्र मोदी आले होते. ज्या भाजपने आमची शिवसेना फोडली अन् त्या फुटीचे समर्थन करत आहेत. ज्यांना भाजपने मांडीवर घेतले आहे. ज्यांनी बाळासाहेबांच्या पक्षाचे, चिन्हाचे नाव नष्ट करण्याचा अफजलखानी विडा उचलला आहे, असे मोदींच्या व्यासपिठावर होते. तर अशा लोकांबरोबर आम्ही पुन्हा जावं असा प्रश्न कसा पडू शकतो. हा आमच्या अस्मितेचा आणि भावनेचा प्रश्न आहे."शिवसेना संपवण्याचे तुम्हाला स्वप्न पडले आहे, ते शक्य नाही. आम्ही शून्यातून उभे राहू आणि पुन्हा एकदा आकाशात झेप घेऊ ऐवढी ताकद आमच्यामध्ये आहे. सध्या वरवरची हवा आहे. ती हवा जाईल, असे संजय राऊत म्हणाले
नरेंद्र मोदी भाजपचे प्रधानमंत्री-
भाजप हे आमच्यासमोर आव्हान नाही. येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी अनेक राज्यात जात आहेत. ते भाजपचे प्रधानमंत्री आहेत. भाजपने त्यांना पक्षापुरचे मर्यादित केले आहे. पंडीत नेहरू हे देशाचे पंतप्रधान होते. फक्त काँग्रेसचे नव्हते. इंदिरा गांधी देशाच्या प्रधानमंत्री होत्या, असे अनेक उदाहरने आहेत. नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतृत्व केले पाहीजे त्यांनी फक्त एका पक्षाचे नेतृत्व करु नये, अशी टीका संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर केली आहे.
काँग्रेस वाचून पर्याय नाही-
सरकारच्या विरोधात विरोधी आघाडी उभी करायची असेल. तर काँग्रेस वाचून पर्याय नाही. मी तुरुंगात असताना राहुल गांधी माझी चौकशी करत होते. देशाची आणि काळाची गरज आहे सर्वांनी एकत्र राहावे. कोणी कितीही म्हटलं तरी काँग्रेसशिवाय ऐक्य शक्य नाही, असे संजय राऊत म्हणाले.