रितेश भाऊच्या 'वेड'चा धुमाकूळ 3 दिवसांत 'एवढी' कमाई...! ठरला टॉप ओपिनिंग मुव्ही

मुंबई:  बॉलीवूडमध्ये चमकलेल्या रितेशनं त्याच्या वेड चित्रपटातून आपलं नाणं मराठीतही किती खणखणीत आहे हे दाखवून दिलं आहे. त्याच्या लई भारी या चित्रपटातून त्यानं चाहत्यांना भारावून टाकलं होतं. आता वेड चित्रपटानं साऱ्या महाराष्ट्राला वेडं केल्याचे दिसून आले आहे.दिग्दर्शन, अभिनय, निर्माता अशा भूमिकेतून रितेशनं वेडचं शिवधनुष्य पेलंल आणि ते यशस्वी करुन दाखवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वेड चित्रपटाची चर्चा होती. सोशल मीडियावर देखील नेटकरी सातत्यानं वेडच्या प्रदर्शनाकडे डोळे लावून बसले होते.अखेर तो प्रदर्शित झाला आणि त्यानं प्रेक्षकांना वेडं केलं आहे. थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत.अशोक सराफ, जेनेलिया आणि रितेश यांच्या भूमिकेनं प्रेक्षकांना भारावून टाकले आहे. यापूर्वी देखील वेगवेगळ्या चित्रपटांमधून रितेश आणि जेनेलियाच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी तोंडभरून कौतूक केले आहे. असे असताना त्याच्या वेडमधील भूमिकेला देखील चाहत्यांनी मनापासून स्विकारले आहे. वेगळी कथा, आणि तितक्याच वेगळ्या प्रकारचा कलाकारांचा अभिनय यामुळे वेड प्रेक्षकांना भावला आहे.प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्शनं ट्विट करुन वेडनं केलेल्या कमाईचे आकडे व्हायरल केले आहेत. त्यामध्ये अवघ्या तीन दिवसांमध्ये वेडनं विक्रमी कमाई करत वेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तीन दिवसांमध्ये वेडनं तब्बल दहा कोटींची कमाई केली आहे. येत्या दिवसांत हा चित्रपट कमाईचा आणखी मोठा आकडा पार करेल. असा अंदाज तरण यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान रितेश आणि जेनेलियानं जास्तीत जास्त प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहावा म्हणून प्रेक्षकांना आवाहन केले आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन त्यांनी प्रेक्षकांना चित्रपट नक्की पाहा असे सांगितलेही आहे. त्याचा सकारात्मक परिणाम बॉक्स ऑफिसवर झाल्याचे दिसून आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने