जातीनिहाय जनगणनेसाठी भाग पाडा : छगन भुजबळ

मुंबई:  एकत्रित लढा आणि सरकारला जातीनिहाय जनगणना करण्यास भाग पाडा, असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी येथे केले.ओबीसींचे हक्क नाकारून देशात एकाधिकारशाही आणत असाल, तर त्याचा आम्ही विरोध करू, असा इशाराही त्यांनी दिला.कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये ओबीसी महासभेच्या कार्यक्रमात बोलताना श्री. भुजबळ म्हणाले, की महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे योगदान देश कधीच नाकारू शकत नाही. त्यांनी केलेल्या कार्यामुळे आज राष्ट्रपतिपदापासून सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर दिसत आहेत.डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून पिचलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. देशात जनगणना न होण्यासाठी केंद्र सरकार कोरोनाचे कारण देत आहे.मात्र आता कोरोनाचे संकट टळत आले असल्याने जनगणना लवकर करून ती जातनिहाय करावी. ज्या समाजाची जेवढी संख्या तेवढा वाटा त्या समाजाला दिला पाहिजे. अनेक योजनांचा लाभ देताना सरकारला लोकसंख्या माहिती नसल्याने अडचणी होतात.सावित्रीबाई फुले, फातिमा शेख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम झाला. श्री. भुजबळ म्हणाले, की मंडल आयोग लागू करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले शरद यादव यांच्या निधनानंतर ओबीसी समाजाला मोठा धक्का बसला.पण आता त्यांच्यानंतर ही जबाबदारी प्रत्येक ओबीसींनी स्वतःच्या खांद्यावर घ्यावी. जातींमध्ये विभागले गेलो, तर कोणता लाभ मिळणार नाही. मात्र एकत्रित राहून ओबीसी म्हणून लढलो, तर मात्र निश्चितपणे समाजाला न्याय मिळेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने