'आमच्याशी चर्चा न करता क्रीडा खात्याने समिती नेमली'

मुंबई: ब्रिजभूषण सरन प्रकरणात केंद्रीय क्रीडा खात्याने नेमलेल्या देखरेख समितीची नियुत्ती करण्यापूर्वी आमच्याशी चर्चा केली नाही, अशी खंत आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये असलेल्या ऑलिंपिक पदकविजेता मल्ल बजरंग पुनिया याने व्यक्त केली.देखरेख समिती नियुक्त करण्यापूर्वी आमच्याशी चर्चा केली जाईल, असे आम्हाला सांगण्यात आले होते, प्रत्यक्षात क्रीडा खात्याकडून असे काहीच घडले नाही आणि त्यांनी थेट नियुक्ती जाहीर केली, त्यामुळे आम्ही निराश झालो आहोत, असे बजरंगने ट्विटरद्वारे आपले मत व्यक्त केले. विशेष म्हणजे हे ट्विट त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांना टॅग केले आहे.


बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया आणि विनेष फोगट यांनी अनुराग ठाकूर यांची सोमवारी भेट घेतली आणि ब्रिजभूषण सरन यांच्याबाबत सविस्तर माहिती दिली. पाच तास ही बैठक चालली होती. त्यानंतर स्वतः अनुराग ठाकूर यांनी बॉक्सर मेरी कोम अध्यक्ष असलेली पाच सदस्यांची समिती जाहीर केली. त्यात ऑलिंपिक पदकविजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त, माजी बॅटमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे टॉप्स योजनेचे सीईओ राजगोपालन आणि साईचे कार्यकारी संचालक राधिका श्रीमान यांचा समावेश आहे.ही समिती जाहीर करताना अनुराग ठाकूर यांनी ब्रिजभूषण सरन यांना कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून चौकशी होईपर्यंत दूर केले आहे आणि मेरी कोम यांच्या समितीकडेच संघटनेचा दैनंदिन कारभार सांभळण्याचेही अधिकार दिले आहेत. त्याअगोदर या आंदोलन करणाऱ्या या कुस्तीपटूंनी भारतीय ऑलिंपिक समितीच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांची भेट घेतली. त्यानंतर उषा यांनी आपल्या इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सात सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केली. या समितीतही मेरी कोम आणि योगेश्वर दत्त यांचा समावेश आहे.

गीता फोगटची पंतप्रधानांना विनंती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करून कुस्ती महासंघातील हे प्रकरण मिटवावे, अशी मागणी जागतिक कुस्ती स्पर्धेतील ब्राँझपदक विजेती गीता फोगट हिने थेट पंतप्रधानांना विनंती केली आहे. देशातील सर्व बहिणी आणि मुली तुमच्याकडे आशेने पाहत आहेत. आम्हाला जर न्याय मिळाला नाही, तर भारतातील कुस्तीतील हे मोठे दुर्दैव असेल, असे गीताने म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने