"बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेच्या विपरीत शिवसेनेची भूमिका त्यामुळे..."

मुंबई: शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांची काल आघाडी झाली. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली. या आघाडीचा भाजपला फटका बसेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेना व प्रकाश आंबेडकर यांच्या युतीचे येणाऱ्या निवडणुकीत परिणाम होतील का? यावर त्यांनी भाष्य केले. ते एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलत होते.देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी युतीचा फार फरक पडणार नाही. ही आघाडी केवळ भाजपला विरोध म्हणून झाली आहे. बाळासाहेब आंबेडकर आणि शिवसेना यांच्या विचारात अंतर आहे. ज्यावेळी मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार झाला. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाला द्यायचे होते. त्यावेळी भाजपने नामविस्ताराचे समर्थन केले. पण शिवसेनेने विरोध केला होता. मंडल आयोग जेव्हा आले तेव्हा आयोगाच्या माध्यमातून आरक्षणाचे भाजपने समर्थन केले होते. पण शिवसेनेने विरोध केला होता. सर्व प्रकारचे आरक्षण रद्द करुन ते आर्थिक निकषांवर केले पाहीजे, ही शिवसेनेची भूमिका होती. जी भूमिका आरपीआयची होती. जी भूमिका डॉ बाबासाहेब आंबेडकरांची होती किंवा आता बाळासाहेब आंबेडकरांची आहे. याच्या विपरीत भूमिका शिवसेनेची आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीस म्हणाले, बाळासाहेबांना वाटते की सातत्याने ते अकोल्यातून निवडणूक लढले. पण ते जिंकून आले नाही. आता त्यांना वाटते शिवसेना सोबत आली म्हणजे त्यांना हिंदुत्ववादी मतं मिळतील. मात्र त्यांना माहित नाही की हिंदुत्ववादी मतांनी शिवसेनेची साथ सोडली आहे. त्यामुळे मला वाटत नाही, याचा फरक पडेल.देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण केले. मात्र नामविस्तारावेळी स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिका मांडली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांची भूमिका मान्य नाही का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.

बाळासाहेब ठाकरेंनी केला होता विरोध

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी १७ वर्षे आंदोलन केल्यानंतर १९९४ साली नामांतर झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मात्र या नामांतराला विरोध होता. १९९४ रोजी नांदेडच्या एका जाहीर सभेत बोलताना बाळासाहेबांनी ‘भाकरीचे पीठही ज्यांना मिळत नाही त्यांना विद्यापीठ कशाला?’ असं वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याने एका नव्या वादाला तोडं फुटले कारण मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या बाळासाहेबांकडून हे वक्तव्य कुणालाच अपेक्षित नव्हतं. मात्र त्यांची भूमिका स्पष्ट होती.रझाकाराच्या भयानक अत्याचाराविरोधात मराठवाड्यातील जनता जीवाची पर्वा न करता लढली. आणि मराठवाडा या शब्दातच मराठी माणसाचे नाते आहे. आपला इतिहास या नावात आहे मग मराठवाड्याचे नाव घालवून आंबेडकरांच्या नावाचा अट्टाहास कशासाठी?, असा प्रश्न बाळासाहेब ठाकरे यांनी उपस्थित केला होता. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने