राहुल गांधींनी पदयात्रा केली रद्द; म्हणाले, माझ्यासाठी खूप कठीण

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात काँग्रेस खासदार राहुल गांधी  यांची भारत जोडो यात्रा  सुरक्षेच्या कारणास्तव स्थगित करण्यात आलीये.सुरक्षा व्यवस्था अपुरी असल्याचं सांगत राहुल गांधी म्हणाले, 'पोलीस यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे पोलीस आम्हाला कुठेच दिसत नाहीत. माझे सहकारी चालताना अस्वस्थ झाले. या कारणास्तव मी ही पदयात्रा थांबवण्याचा निर्णय घेतला. मात्र, माझे इतर सहकारी अजूनही चालत आहेत.'काँग्रेस नेत्यानं सांगितलं की, पोलिसांनी गर्दी हाताळण्यासाठी व्यवस्था करणं महत्वाचं होतं, जेणेकरून आम्हाला प्रवास करता येईल. माझ्या सुरक्षा कर्मचार्‍यांच्या सल्ल्याविरुद्ध जाणं माझ्यासाठी खूप कठीण होतं, म्हणून हा निर्णय घेण्यात आला.जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या सुरक्षेतील त्रुटीमुळं काझीगुंडजवळ आज भारत जोडो यात्रा थांबवण्यात आली. जम्मू-काश्मीर काँग्रेसच्या प्रभारी रजनी पाटील यांनी ट्वीट केलं की, राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेला सुरक्षा पुरवण्यात जम्मू-काश्मीर प्रशासन अपयशी ठरलंय. यातून सुरक्षेबाबत प्रशासनाची अयोग्य वृत्ती दिसून येते, असं त्यांनी म्हटलंय. राहुल गांधी आज 11 किलोमीटर चालणार होते, पण केवळ 500 मीटर चालल्यानंतर त्यांना थांबावं लागलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने