‘अबराम’ आणि ‘लेपर्ड’ युद्धभूमीवर उतरणार

 बर्लिन : युक्रेनच्या अनेक महिन्यांपासूनच्या मागणीनंतर अमेरिका आणि जर्मनीने अखेर त्यांना रणगाडे देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. रशियाविरोधातील युद्धात या रणगाड्यांमुळे मोठे बळ मिळेल, अशी प्रतिक्रिया युक्रेनने दिली आहे. युक्रेनला रणगाडे पाठविण्याचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या कार्यालयातर्फे सांगण्यात आले आहे.अमेरिकेकडून तीस ‘एम-१ अबराम’ रणगाडे आणि जर्मनीकडून किमान १४ ‘लेपर्ड-२’ रणगाडे युक्रेनला पाठविले जाण्याची शक्यता आहे. 

युक्रेनला रणगाडे देण्यासाठी जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ शोल्झ यांच्यावर इतर युरोपीय देशांचा दबाव होता.जर्मनीने आतापर्यंत युक्रेनला मदत केली असली तरी त्यात भरीव असे काही नव्हते. त्यामुळे रणगाडे देण्याच्या त्यांच्या निर्णयावर युक्रेनने समाधान व्यक्त केले आहे. ‘रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये वाढ झाली असल्याने त्यांचा सामना करण्यासाठी रणगाड्यांची गरजच होती.या रणगाड्यांच्या मदतीने रशियाने ताब्यात घेतलेले भूप्रदेश परत मिळविण्यास मदत होईल,’ असे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ब्रिटनही युक्रेनला ‘चॅलेंजर-२’ रणगाडे देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, पोलंडही युक्रेनला रणगाडे पुरविणार आहे.

आणखी एक चिथावणी : रशिया

युक्रेनला रणगाडे पुरविण्याचा निर्णय म्हणजे रशियाविरोधात दिली गेलेली आणखी एक चिथावणी आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिकेतील रशियाच्या राजदूतांनी दिली आहे. तसेच, जर्मनीने घेतलेल्या निर्णयाचा काही फायदा होणार नसून, उलट त्यामुळे त्यांच्या रशियाबरोबरील संबंधांवर दीर्घ परिणाम होणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

रणगाड्यांचा फायदा

केवळ रणगाड्यांच्या जोरावर युद्ध जिंकता येत नाही, हे यापूर्वीच्या अनेक युद्धांत दिसून आले आहे. मात्र, युद्ध जिंकण्यात त्यांची मोलाची भूमिका असते, हेदेखील सिद्ध झाले आहे. युक्रेनला केवळ रशियाचे आक्रमण रोखण्यासाठी रणगाडे नको आहेत; तर त्यांना रशियाच्या ताब्यातून आपला भूभाग परत मिळवायचा आहे. अबराम, चॅलेंजर आणि लेपर्ड हे रणगाडे रशियाच्या रणगाड्यांपेक्षा वेगवान आणि अत्याधुनिक आहेत. त्यामुळे वेगवान कारवाई करत प्रदेशावर ताबा मिळविण्यासाठी रणगाड्यांचा उपयोग होऊ शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने