गोल्डन बॉयचा गोल्डन सल्ला अन् भारताच्या 19 वर्षाखालील मुलींनी रचला इतिहास

मुंबई: भारताच्या 19 वर्षाखालील टी 20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारतीय मुलींच्या संघाने इंग्लंडचा 7 विकेट्स राखून पराभव करत इतिहास रचला. भारतीय महिला क्रिकेट इतिहासातील पहिला वहिला वर्ल्डकप जिंकला. या विजयाचा साक्षीदार ठरला तो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा! भारताच्या 19 वर्षाखालील मुली ज्यावेळी ही ऐतिहासिक कामगिरी करत होत्या त्यावेळी नीरज चोप्रा स्टँडमध्ये उपस्थित होता. नीरजने फक्त सामन्याला उपस्थिती लावली नाही तर भारताच्या मुलींना मोलाचा सल्ला देखील दिला होता.19 वर्षाखालील महिला क्रिकेट टी 20 वर्ल्डकपचा अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले. या ट्विटमध्ये भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा हा भारतीय मुलींना यशाचा कानमंत्र देताना दिसला. त्यानंतर नीरज चोप्राने स्टँडमधून भारताच्या मुलींची फायनल पाहिली आणि त्यांना चिअर अप देखील केले. याबाबतचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.नीरज चोप्रा मुलींशी बोलताना म्हणाला की, 'दबावात खेळू नका, जसं आता मजा-मस्ती करत खेळत आहात तसेच फायनलमध्ये देखील खेळा. खूप कष्ट करा, प्रत्येक गोष्टीसाठी तयार रहा. जे लोक आपल्या देशासाठी खेळतात त्यांच्यासाठी देशासाठी खेळणे हीच एक प्रेरणा असते. आपला देश खूप मोठा आहे त्यात अनेक मुली खेळत असतात. त्यापैकी तुम्हाला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.तुम्ही क्रिकेट खेळण्यास का सुरुवात केली, तुमची पार्श्वभूमी काय आहे हे कायम लक्षात ठेवा.'नीरज चोप्राला तुम्ही गोलंदाजी करणार का असे विचारल्यानंतर तो म्हणाला की, हो मी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करेन असे सांगितले. यानंतर भारतीय संघाकडून नीरज चोप्राला टीम इंडियाची जर्सी देखील भेट देण्यात आली. त्यानंतर नीरजने टीम इंडियाचा टी-शर्ट घालून खेळाडूंसोबत फोटो काढले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने