'पठाण'वरुन वाद सुरू असतानाच PM मोदींचं मोठं वक्तव्य; भाजपच्या नेत्यांना दिला 'हा' आदेश

दिल्ली : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान  आणि दीपिका पदुकोण  हिच्या पठाण चित्रपटावरून वाद सुरूच आहे. आता या वादात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच उडी घेतलीये.पंतप्रधान मोदींनी भाजप नेत्यांना चित्रपटांवर अनावश्यक वक्तव्ये टाळण्याचा सल्ला दिलाय. भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या समारोपाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी भाजप नेत्यांना कठोर संदेश दिला. जे नेते माध्यमांसमोर काही वक्तव्य करतात आणि त्यावरून मोठा वाद निर्माण होतो, अशा नेत्यांना त्यांनी सूचना दिल्या आहेत.पंतप्रधान मोदींनी पक्षाच्या नेत्यांना अनावश्यक वक्तव्ये टाळण्यास सांगितलंय. एकीकडं पक्षाचे मोठे नेते दिवसभर काम करत असतात आणि दुसरीकडं काही लोक चित्रपटांविषयी वक्तव्य करून वाद निर्माण करतात. त्यानंतर संपूर्ण दिवस टीव्ही आणि माध्यमांमध्ये तेच सुरू असतं. अशी अनावश्यक वक्तव्ये करणं टाळली पाहिजेत, असंही त्यांनी सांगितलं.
पंतप्रधानांचं हे वक्तव्य अशा वेळी समोर आलं, जेव्हा शाहरुख खानच्या पठाण चित्रपटावरून देशात वाद सुरू आहे. पठाण चित्रपटातील एका गाण्यात दीपिका पदुकोण  भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दाखवल्याबद्दल वाद झाला आहे, त्यामुळं अनेक भाजप नेत्यांनी पठाण चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.चित्रपटाला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी हे सर्व करण्यात आलं की सुनियोजित कटातून हा वाद निर्माण करण्यात आला आहे, असा सवाल भाजपचे नेते राम कदम  यांनी उपस्थित केला होता. कोणताही चित्रपट किंवा टीव्ही मालिका हिंदू समाजाच्या भावनांचा अपमान करत असेल तर तो महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, असंही कदम म्हणालेत.

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही पठाण वादावर वक्तव्य केलंय. चित्रपटातून आक्षेपार्ह दृश्ये काढून टाकावीत, अन्यथा मध्य प्रदेशात चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी मागणी त्यांनी केलीये. बिहारसह इतर राज्यांमध्ये पठाण चित्रपटातील गाण्याबाबत आक्षेप घेण्यात आले आहेत. बिहारमध्ये भाजप नेते हरिभूषण ठाकूर बच्चौल यांनी तर पठाण चित्रपटाचं प्रदर्शन राज्यात रोखण्याची मागणी केली होती. भगवा रंग हे आपल्या धर्माचं प्रतिक असल्याचं ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने