श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला भारताचा आधार

श्रीलंका:  श्रीलंकेला भेडसावणाऱ्या आर्थिक संकटाच्या काळात आम्ही त्यांच्यासोबत असून या देशात गुंतवणुकीसाठी भारत प्रोत्साहन देईल, असे आश्‍वासन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज दिले. ऊर्जा, पर्यटन आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये गुंतवणूकीला विशेष प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.श्रीलंका दौऱ्यावर आलेल्या एस. जयशंकर यांनी आज अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांची भेट घेतली. तुमच्या अडचणीच्या काळात आम्ही तुमच्यासोबत आहोत, हे सांगण्यासाठी मी येथे आलो आहे, असे जयशंकर यांनी नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. ‘शेजाऱ्यांना प्राधान्य देण्याचे आमचे धोरणच आहे.त्यांना आम्ही अडचणीत एकटे सोडणार नाही. श्रीलंकेला कर्ज देणाऱ्यांनी स्वत:हून पुढाकार घेत या देशाला मदत करायला हवी. इतर कोणी मदत करायची वाट न पाहता आम्ही आमचा मदतीचा हात पुढे केला आहे,’ असे जयशंकर म्हणाले. श्रीलंकेला आर्थिक संकटातून सावरण्यासाठी भारताने चार अब्ज डॉलरचे मदतकर्ज दिले आहे. शिवाय, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडूनही मदत मिळावी यासाठी हमी दिली आहे.श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेचा तोल सावरण्यासाठी या देशात मोठी गुंतवणूक करणे, हाच मार्ग असल्याचे जयशंकर यांनी ठामपणे सांगितले. आम्ही हे इतर गुंतवणूकदारांनाही पटवून देऊ. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत, विशेषत: ऊर्जा, पर्यटन आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांमधील गुंतवणूकीसाठी आम्ही प्रोत्साहन देऊ.श्रीलंका सरकारनेही उद्योगस्नेही वातावरण तयार करावे, असे आवाहन जयशंकर यांनी केले. अपारंपरिक ऊर्जेचे मोठे केंद्र म्हणून विकसीत होण्याची श्रीलंकेमध्ये क्षमता असून यादृष्टीने प्रयत्न केल्यास त्यात भागीदार म्हणून सहभागी होण्यास भारत तयार आहे, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

१३ वी घटनादुरुस्ती आवश्‍यक

श्रीलंकेतील अल्पसंख्य तमिळ नागरिकांना सर्वार्थाने मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी १३ व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे, अशी भूमिकाही परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी मांडली.या घटनादुरुस्तीद्वारे श्रीलंकेतील तमिळ समुदायाला अधिक अधिकार देण्याची तरतूद आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात १९८७ मध्ये झालेल्या करारानुसारच ही घटनादुरुस्ती झाली आहे. श्रीलंकेमध्ये आर्थिक स्थैर्याबरोबरच राजकीय स्थैर्यही असावे, अशी भारताची इच्छा आहे, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने