सुदानमध्ये शांततेसाठी भारतीय महिला जवान

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये सर्वाधिक सैन्य तैनात करून योगदान देणाऱ्या भारताने सुदानमधील अबयेई येथील शांती मोहिमेत महिला सैनिकांची तुकडी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. शांतिमोहिमेसाठी भारत पाठवत असलेली महिला सैनिकांची ही सर्वांत मोठी तुकडी असेल.शांतता मोहिमांमध्ये महिलांचाही सहभाग वाढावा, असा भारताचा उद्देश असून त्याहेतूनेच हा निर्णय घेण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या कायमस्वरुपी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी याबाबत माहिती देताना महिलांच्या तुकडीबरोबरील छायाचित्रही ट्विटरवर प्रसिद्ध केले आहे.भारत २००७ पासून शांतिमोहिमांमध्ये महिलांच्या तुकडी पाठवत आहे. अबयेईमध्ये तैनात होणारी यंदाची ही सर्वांत मोठी तुकडी असेल. याबाबत कंबोज यांनी सांगितले की, ‘‘भारतीय महिलांच्या या तुकडीत दोन अधिकारी आणि २५ इतर पदांवरील सैनिक आहेत.सुदानमधील अबयेईमध्ये संयुक्त राष्ट्रांद्वारे घेतल्या जाणाऱ्या विविध पुढाकारांमध्ये त्या सहभाग घेतील. तसेच, सुरक्षेसंबंधी कार्यही करतील. अबयेईमध्ये महिला व लहान मुलांना संघर्षाला सामोरे जावे लागत असल्याने महिलांची तुकडी तैनात केल्याने संघर्ष कमी होण्यास मदत होऊ शकते.’’

‘महिलांना कमी समजू नका’

शांतता प्रक्रियेत महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो, अशी भारताची भूमिका आहे. त्यामुळे महिलांना कमी लेखण्याचे कारण नाही, असे रुचिरा कंबोज यांनी सुरक्षा समितीच्या गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या बैठकीत ठामपणे सांगितले होते.भारताने २००७ मध्ये लायबेरिया येथे सर्वप्रथम महिला शांतिसैनिकांची तुकडी तैनात केली होती, त्यावेळी त्यांच्या कामामुळे लायबेरियातील अनेक महिलांना सुरक्षा क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली होती, असेही कंबोज यांनी निदर्शनास आणून दिले होते.

महिला अधिकाऱ्यांची कामगिरी

शांतता मोहिमांमध्ये भारतीय महिला अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या पहिल्या पोलिस सल्लागार डॉ. किरण बेदी, संयुक्त राष्ट्रांच्या २०१९ च्या लैंगिक विभाग सल्लागार मेजर सुमन गवानी आणि शक्ती देवी यांनी आपला ठसा उमटविला आहे.जम्मू-काश्‍मीर पोलिस दलातील अधिकारी असलेल्या देवी यांनी अफगाणिस्तानमध्ये काम करताना येथील लैंगिक अत्याचारांबा बळी पडलेल्या महिलांना मोठी मदत केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने