लाल मातीतील दंगलला धूमधडाक्यात सुरुवात

पुणे: महाराष्ट्र केसरी या राज्यातील मानाच्या कुस्ती स्पर्धेला मंगळवारी सुरुवात झाली. बीडच्या आशिष तोडकर, कोल्हापूरच्या सूरज अस्वले, पुणे जिल्ह्याच्या स्वप्नील शेलार यांनी ५७ किलो गटातून; तर पुणे जिल्ह्याच्या प्रतीक जगताप, कल्याणच्या ओंकार भोईर, जळगावच्या ऋषिकेश वैरागी यांनी ८६ किलो वजनी गटातून आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करताना स्पर्धेत विजयी सलामी दिली.८६ किलो वजनी गटात जालना जिल्ह्याच्या अभिषेक परीवले याने पिंपरी चिंचवडच्या शेखर लोखंडेला १४-४ असे पराभूत केले. कोल्हापूरच्या ऋषिकेश पाटीलने गिरिधर डुबेला ४-० असे नमवले. 


जळगावच्या योगेश वैरागीने अमरावतीच्या विवादासला चीतपट करताना आगेकूच केली. कल्याणच्या ओंकार भोईरने चंद्रपूरच्या फैजान शेखला १०-० असे हरवले. पुणे जिल्ह्याच्या प्रतीक जगतापने सांगलीच्या भरत पवारवर ७-६ अशी मात केली.५७ किलो वजनी गटात बीड आशीष तोडकरने कोल्हापूर शहरच्या अतुल चेचर याला ९-४ असे एकतर्फी पराभूत केले. याच गटात कोल्हापूरच्या सूरज अस्वलेने जळगावच्या यशवंतवर ११-० अशी मात करताना पुढे पाऊल टाकले. पुणे जिल्ह्याच्या स्वप्नील शेलारने नागपूरच्या अंशुल कुंभारकरला थेट चीतपट केले. यवतमाळच्या यश राठोडने नाशिकच्या समर्थ गायकवाडला १२-५ असे पराभूत केले.

कुस्तीपटूंचा सर्वांगीण विकास करणार : चंद्रकांत पाटील

आजी-माजी कुस्तीगिरांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार सकारात्मक असून, कुस्तीगिरांना आरोग्य सुविधा, सन्मानजनक मानधन, निवृत्तिवेतन व अन्य सुविधा देण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, तसेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने