कट्टर विरोधक असलेल्या केशवराव धोंडगेंमुळे बाळासाहेबांची अटक टळली होती...

मुंबई:  मराठवाड्यातील शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते, स्वातंत्र्य सेनानी केशवराव धोंडगे यांचे नुकतेच निधन झाले. वयाच्या 102 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते पाच वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ म्हणून त्यांची ओळख होती.नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात असलेल्या एका छोट्याशा गावातून केशवराव धोंडगे यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. त्यांनी शेतकरी कामगार पक्षासोबत स्वत:ला जोडून घेतले. त्यांची साम्यवाद, मार्क्सवाद अशा दोन्ही विषयांवर अढळ निष्ठा होती. त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न अत्यंत पोटतीडकिने विधिमंडळ आणि संसदेत मांडले.
हिंदुत्ववादाचे पुरस्कर्ते असणाऱ्या शिवसेनेचे केशवराव धोंडगे हे कट्टर विरोधक होते. मात्र विचारांचा विरोध कधी वैयक्तिक पातळीवर उतरू दिला नाही. वेळप्रसंगी आपल्या विरोधकाला सुद्धा मदत करायचा मराठवाडी दिलदारपणा केशवराव धोंडगे यांनी अखेर पर्यंत दाखवला. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मध्यंतरी एकेठिकाणी केशवराव धोंडगे यांच्या दिलदारपणाचा एक जुना किस्सा सांगितला होता. ते म्हणाले "मी एक गोष्ट सांगतोय, जी कदाचित अनेकांना माहिती नाही.त्यावेळी शीख धर्मियांच्याविरुद्ध बाळासाहेब ठाकरेंनी एक टिप्पणी केली होती. त्यामुळे शीख धर्मियांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यावेळी शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते. ते अतिशय कडक आणि नियमाने चालणारे होते. घाबरणारे नव्हते.त्यांनी निर्णय घेतला की बाळासाहेब ठाकरे यांना अटक करायची."ही गोष्ट कानोकानी आमच्या शिवसेनेच्या गोटामध्ये पोहोचली. त्यावेळी मनोहर जोशी, नवलकर छगन भुजबळ यांना म्हणाले की, 'बाळासाहेबांनी केलेल्या विधानामुळे त्यांना अटक होणार. काहीतरी करायला पाहिजे.' हे शंकरराव चव्हाण यांना कसं सांगायचं?शिवसेनेचे फायर ब्रॅंड नेते म्हणून छगन भुजबळ यांची ओळख होती. त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली.

ते सरळ केशवराव धोंडगेंना भेटायला गेले आणि यापूर्वी बाळासाहेबांना अटक झाल्यानंतर मुंबई कशी तीन दिवस जळत होती याबद्दल सांगितलं. त्यावर केशवराव धोंडगे म्हणाले काळजी करू नको. पुढे अधिवेशनात सभागृह सुरू झाले.केशवराव धोंडगे उभे राहिले आणि म्हणाले मला बोलायचं आहे. केशवराव धोंडगे शंकरराव चव्हाण यांना म्हणाले, मुख्यमंत्री महोदय, आम्हाला असे कळलंय की तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचा निर्णय घेतला आहे.तुम्हाला कल्पना आहे की, जेव्हा बाळासाहेब ठाकरेंना अटक झाली, तेव्हा तीन दिवस मुंबई जळत होती. तुम्ही असा परत निर्णय घेणार आणि मुंबई-महाराष्ट्राला वेठीस धरू पाहत आहात का? तुम्ही याचा फेरविचार केला पाहिजे.टिप्पणी केली असेल, मीटिंग घ्या, दोन्हीकडील लोकांना बोलवा, पण असा निर्णय घेऊ नका आणि मुंबई, महाराष्ट्राला अडचणीत आणू नका."छगन भुजबळ सांगतात "केशवरावांच्या भाषणानंतर प्रसंगी कठोर भूमिका घेणाऱ्या शंकरराव चव्हाणांसारख्या नेत्याने आपला निर्णय मागे घेतला आणि त्यावेळी घडणारा प्रसंग टळला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने