सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत RSS प्रमुखांचं मोठं विधान; भागवत म्हणाले, नेताजींचं आयुष्य वनवासात..

कोलकाता : थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आज देशभरात साजरी होत आहे. आजचा दिवस 'पराक्रम दिवस' म्हणूनही साजरा केला जातो. यानिमित्त पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.याच अनुषंगानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कोलकाता येथील शहीद मिनार मैदानावर संघाच्या प्रार्थनेनं कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संघप्रमुख मोहन भागवतही आले होते. यावेळी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.कोलकात्यातील कार्यक्रमात भागवत म्हणाले, 'नेताजींनी आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केलं. नेताजींचं आयुष्य जवळजवळ वनवासात राहण्यासारखंच होतं. त्यांनी आपलं बहुतेक आयुष्य वनवासात घालवलं. देशासाठी त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं.'भागवत पुढं म्हणाले, आज संपूर्ण जग भारताकडं आशेनं पाहत आहे. नेताजींची स्वप्नं अजूनही पूर्ण झालेली नाहीत. आपण मिळून ती पूर्ण केले पाहिजे. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आपल्या पूर्वजांनी दाखवलेल्या मार्गानं आपण या जगात शांतता आणि बंधुता पसरवू शकतो. आज संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडं लागलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.संघाच्या दक्षिण बंगाल प्रांताचे प्रचार प्रमुख बिप्लव रॉय यांनी सांगितलं की, कोलकाता आणि हावडा महानगरातून या कार्यक्रमात 15,000 हून अधिक स्वयंसेवक सहभागी होते. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत शहीद मिनार मैदानावर स्वयंसेवकांनी पथसंचलन, उद्घोषणा, कदमताल केलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने