तुमच्या मुलींना फक्त शिक्षणाची नाही तर 'या' गोष्टींचीही आहे गरज

मुंबई: भारतात दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो. देशातील मुलींना शिक्षित, सशक्त व सक्षम बनवण्याच्या उद्देशातून दरवर्षी भारतात(India)  24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. 24 जानेवारी 1966  या दिवशीच इंदिरा गांधी यांनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. महिला सक्षमीकरण आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून निवडला गेला. 2009 सालापासून देशात राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.पण महिला सक्षमिकरण म्हटलं की, फक्त मुलींच्या शिक्षणावर भर दिला जातो. आज मुलींच्या शिक्षणाची परिस्थिती सरकारच्या प्रयत्नाने आणि पालकांच्या जागरुकतेने तुलनेने खरंच वाखणण्या जोगी आहे. परंतु फक्त शिकवलं म्हणजे झालं का? की, आज बाहेरच्या जगात वावरताना तुम्हाला मुलींना अजून कशाची तरी गरज आहे असं जाणवतं का? तर त्या गोष्टी कोणत्या जाणून घेऊया.

सेल्फ डिफेन्स

स्व संरक्षण हे आजच्या काळात मुलींना सर्व प्रथम शिकवण्याची आवश्यकता आहे. दिवसें दिवस वाढत चाललेले अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना लक्षात घेता, मुलींना स्वतःलाच स्वतःच संरक्षण कसं करावं याविषयी पालकांनी लहानपणा पासूनच प्रशिक्षण देणं आवश्यक आहे.लैंगिक शिक्षण

मुलींच्या वयात येण्याचं वय दिवसें दिवस अलिकडे येत असल्याचं काही सर्वेक्षणातून समोर आलं आहे. अन्नाचा निकृष्ठ दर्जा, खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी आणि इंटरनेट, टी.व्ही., सिनेमांच्या माध्यमातून फार लवकर सेक्स विषयाचं मिळणारं एक्सपोजर यामुळे हे वय कमी होत असल्याचं समोर आहे. त्यामुळे मुलींना वेळीच लैंगिक शिक्षण देणं गरजेचं आहे. शरीरात होणारे बदल आणि मासिक पाळी या संदर्भात मुलींशी संवाद साधला जाणे गरजेचं आहे.

आत्मविश्वास

मुलींचा स्वभाव मुळात हळवा, लाजरा असावा अशी समाजाची धारणा असली तरी हल्लीचा काळ त्याला अजिबात पुरक नाही. त्यामुळे तुमच्या मुलींना लहानपणापासूनच इतरांपेक्षा स्वतःवर विश्वास ठेवण्यास शिकवणे आवश्यक आहे. मी मुलगी आहे म्हणून हे नाही करू शकत अशी कोणतीही भावना तिच्यात राहू नये. उलट मी सगळं काही एकट्यानेही करू शकते असा विश्वास तिच्यात निर्माण करणं गरजेचं आहे.

समानता

जर घरात मुलगी आणि मुलगा असेल तर हे काम मुलीने करावं आणि हे काम मुलाने करू नये असे संस्कार करू नका. दोघही समान पातळीवर आहेत याची जाणीव त्यांच्यात रुजू द्या. वयात येणाऱ्या मुलींमध्ये होणाऱ्या शारीरिक बदलांनी काही न्युनगंड वाढण्याची शक्यता असते. त्यातून बाहेर येण्यासाठी मदत मिळणं गरजेचं आहे.

स्वतंत्र विचार, मते

तुमचे विचार स्वतंत्र असावे, तुम्हाला मते असावी, ते ठाम पणे मांडता यावीत असा विश्वास आज आपल्या मुलीत निर्माण करणं गरजेचं आहे. मुलींनी मध्येमध्ये बोलू नये अशी मानसिकता आता पालकांनीही सोडणं आवश्यक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने